रिज्क्स म्युझियम बंद होईपर्यंत आम्ही तिथे फिरत
होतो. बाहेर आलो आणि थकलेल्या पावलांना विसावायला बागेत जाऊन बसलो. त्या देखण्या
बागेत अतिशय सुंदर कारंजं थुयथुयत होतं. जमिनीतून उफाळून वर येणाऱ्या त्या
कारंजांत मुलामाणसांची मुक्त धमाल चाललेली. आम्ही एका निरतिशय सुंदर अशा भव्य
वृक्षाखाली बसलो. समोर कारंज, उजवीकडे म्युझियम आणि सभोवती शांतपणे वाचत किंवा हळू
बोलत गप्पा मारत बसलेली माणसे... उठूच नये असं वाटतच उठलो. बाहेर पडल्यावर समोरच
सात फुटी उंचीच्या लालबुंद अक्षरं उभी होती... I a m s t e r d a m… आणि त्या पलिकडे
आय़ताकृती जलाशय आणि त्याच्याभोवतीने पाय बुडवून बसलेली माणसं.
तिथे पोहोचलो तर लाल टीशर्ट्स घातलेले सातआठ युवक
त्या मोठमोठ्या अक्षरांसमोर उभे राहिले. आणि खणखणीत आवाजात ओरडू लागले... व्हॉट
टाईम इ इट बडी... इट्स शो टाईम... बराच वेळ आरडाओरडा करून त्यांनी आपल्या भोवती
गर्दीचे रिंगण जमवले. आणि मग कसरती सुरू केल्या. बघ्या लोकांनी यासाठी आपल्याला
थोडेफार युरोज् द्यावेत ही अपेक्षा स्पष्ट बोलून दाखवली. पन्नास युरोज् गोळा
करण्याची त्यांची अपेक्षा होती. मग त्यांच्या धमाल कसरती सुरू झाल्या. साशा फ्रॉम
रश्याची कसरत तर फारच धमाल होती. मधे एक ब्रेक घेऊन त्यांनी पैसे गोळा केले. म्हणाले कसरत अजून बाकी आहे,
पण सगळा खेळ संपल्यावर लोक पटकन् पळून जातात म्हणून मुख्य शोच्या आधीच आम्ही पैसे
गोळा करतोय बरं... लोकांनी पैसे दिले ते त्यांनी लगोलग मोजलेही. पण ते सगळे पन्नास
युरो नव्हते. मग म्हणाले... हं... तुमच्यापैकी काहीजणांनी अजिबात काही पैसे दिलेले
नाही, कळतंय आम्हाला... पण ठीक आहे... आणि मग त्यांनी शेवटच्या काही कसरती केल्या.
मग आवराआवर करून सायकली घेऊन ते दुसऱ्या ठिकाणी जायला निघाले.
परतताना आम्ही डॅम स्क्वेअर या अमस्टरडॅममधल्या
सुप्रसिध्द चौकातून चक्कर मारली. ज्या अमस्टेल नदीवरून या शहराचे नाव पडले तिच्या
टोकावर बांधलेले धरण पूर्वी इथे होते. मग ते थोडे पुढे गेले. त्या धरणाच्या मागचा
हा लांबरुंद चौक आता शहरातला फार महत्त्वाचा चौक आहे. या चौकात वाहनांना आतमधे
प्रवेश नाही. लोक मुक्तपणे फिरत असतात. कसरतवाले, गाणी म्हणणारे लोक तिथेही येतात.
या चौकात एक विचित्र हत्याकांड दुसरे महायुध्द संपतासंपता घडले होते. याच
चौकातल्या एका प्रासादतुल्य वास्तूत दोन शतकभरांपूर्वी लुई बोनापार्टने आपला
राजनिवास बांधला होता. (आता तिथे राजघराण्यातील लोकांच्या वंशावळींचे म्युझियम
आहे.) इथेच बाजार भरत असे. आता या चौकाच्या बाजूने तो जुना राजप्रासाद, एक चर्च-
न्युव चर्च- आहे- इथे नेदरलॅण्डच्या राजघराण्यातील व्यक्तींचे विवाहसोहळे अजूनही
पार पडतात, पण एरवी त्याचा वापर म्युझियमसारखाच होतो. एका टोकाला दुसऱ्या
महायुध्दात बळी पडलेल्यांचे एक स्मारक आहे पांढराशुभ्र दगडी सुळका आणि त्यावर
कोरलेल्या मानवी वेदनार्त प्रतिमा. या चौकात वर्षातून अनेक कार्यक्रम होतात, मुलांसाठी
आनंदजत्रा होतात. उगीच एक चक्कर मारून तिथून बाहेर पडलो. तिथून जवळच अमस्टरडॅमचा
रेड लाईट एरिया डी-वॉलेन आहे. एक मोठे डिपार्टमेंट स्टोअर आहे, एक फार जुने,
सुप्रसिध्द होटेलही आहे. पण सर्वात अनुभवण्यासारखे होते ते तिथले उत्साहाने
फसफसणारे तरीही साधेसुधे वातावरण. पाय कमी दमलेले असतील तेव्हा पुन्हा एकदा इथे
येऊ या म्हणत आम्ही तिथून निघालो. बस किंवा ट्राम पकडायला रस्त्यावर गेलो तर
समोरच्या एका जुन्या भव्य वास्तूने खुणावले. त्या जुन्या भव्य दगडी इमारतीच्या
बाहेरून काहीही पत्ता लागत नव्हता, पण आतमधे एक सुसज्ज सुंदर मॉल होता. वारसा
जपण्याच्या समित्यांचा खल आणि गोंधळ न घालता ती इमारत सुंदर रीतीने जपलीही होती
आणि वापरलीही होती. मुंबईत टाटांच्या ताब्यात असलेल्या शंभर वर्षांपूर्वीच्या
आर्मी आणि नेव्ही बिल्डिंगची आठवण आली.
थकलेले पाय आणि प्रसन्न मन घेऊन त्या देखण्या
शहरातून ट्रामने फिरत आम्ही परतलो.
पंधराव्या मजल्यावरून दिसणारा सूर्यास्त मोठा
मनोहर होता. तांबूस सोनेरी किरणांत दूरवर एक सूर्यरंगाच्या छटांत रंगवलेली इमारत
झळझळून उठली होती. क्षितिजावर असलेल्या समुद्राचं, बंदराचं अस्तित्व अचानकच
उन्हाने उघड केलं होतं. आणि अचानक छानसा उन्हेरी पाऊस आला...
No comments:
Post a Comment