आता एकच दिवस पॅरीसचा. उद्या मात्र प्रकाश जोशी यांच्या
खास शिफारसीमुळे पॉम्पिदू सेंटर आणि मग माँटेमोर्त किंवा सॅक्रीकूअरला जाऊन
कलात्मक ‘पारी’ची लज्जत चाखणार.
पॅम्पिदू सेंटर म्हणजे मॅडॅम पाँपेदूँच्या नावाने
केलेलं म्यूझियम आहे असा माझा समज झालेला. ही पंधराव्या लुईची लाडकी बाहरवाली.
गायिका, अभिनेत्री, कलासाहित्यात रस असलेली सुंदरी राजाच्या दरबाराची सदस्य. राणी इतकाच
तिलाही सन्मान होता वगैरे माहीत होतं. म्हणून तिच्या नावाने म्यूझियम काढलं असेल
असं वाटलं. प्रकाश जोशींनी सांगेपर्यंत या सेंटरचं अस्तित्वच माहीत नव्हतं.
ब्यूबर्ग भागात सकाळीच पोहोचलो. इमारत खूप वेगळ्याच प्रकारे बांधलेली आहे हे माहीत
होतं. आम्ही गेलो ते मागच्या बाजूने. त्यामुळे आधी तर वाटलं ही कुठली तरी काम चालू
असलेली इमारत असावी. मग प्रवेशद्वार शोधत पुढच्या बाजूने गेलो तेव्हा. समोरचं
मोकळं प्रांगण आणि इमारतीची सुंदर आगळीवेगळी दर्शनी बाजू दिसली. साधरणतः
इमारतींतील जे काही आत दडवले जाते ते सारे बाहेर होते. पाइप्स, जिने, व्हेन्ट्स
सारेसारे बाहेर. रेंझो पियानो आणि रिचर्ड रॉजर्स या दोन आर्किटेक्ट्सनी या
इमारतीची रचनासंरचना मांडली. यातल्या बाहेर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी रंग
ठरवण्यात आले. एअर कंडिशनिंगसाठी निळा, एलेव्हेटर्ससाठी लाल, प्लंबिंगसाठी हिरवा
वगैरे. त्यामुळे उलटीपालटी तरीही रंगीतसंगीत अशी ही इमारत साऱ्या जगात आपल्या
वेगळेपणाने उठून दिसते. शिल्प, चित्र, इतर इन्स्टॉलेशन आर्ट, छायचित्रकला, सिनेमा,
संगीत, नाट्य असे वेगवेगळे कलाप्रकार इथे हजेरी लावत असतात. पाच मजले पूर्ण मोकळा
अवकाश या कलासंस्कृतीच्या नवनव्या प्रयोगांसाठी खुला आहे. खालच्या मजल्यावर
पुस्तकांचे प्रचंड मोठे दुकान, नव्या डिझाइनच्या कलात्मक आणि उपयुक्त वस्तूंचे
दुकान, कॅफेटेरिया आहे. आणि मग वरच्यावरच्या मजल्यांवर वेगवेगळी प्रदर्शने. काही
कायमस्वरूपी काही तात्पुरती. म्यूझियम, आर्ट गॅलरी आणि इतर कलाविष्करणाची एक
ऊर्जस्वल जागा अशी या सेंटरची युरोपात ओळख आहे. तीसच वर्षांपूर्वी बांधून झालेले
हे सेंटर जगभरच्या नव्या कलाकारांचे आणि रसिकांचे आनंदनिधान बनले आहे. पाय दुखून
आले तेव्हा आणि डोळ्यांनी आणखी काही ग्रहण करायचं थांबवलं तेव्हा तिथून बाहेरच
पडलो. समोरच्या प्रांगणात एव्हाना गायक, वादक, कलाकुसरीच्या वस्तू विकणारे यांची
छोटीशी जत्रा भरलेली. आणि एक तरुणी लांबलचक आल्पहॉर्न घेऊन
वाजवत होती. एका हाताने एका डमरूसदृश तुंब्याच्या वाद्यावर ताल धरत होती. त्या
आवाजाने कुंदकुंद होत होतं. पुढे जाऊन सगळया फिरस्त्यांची, कारागिरांची पाहाणी करत
गेलो. एक म्हातारी जिप्सीसारखी बाई रंगीत मण्यांपासून, दगडांपासून विणून केलेले
दागिने, फ्रेन्डशिप बँड्स विकत होती. छान कलात्मक रंगसंगती आणि आकार होते. आणि
किंमत भरमसाठ.
तिथेच बाजूला एक छोटासा जलाशय होता आणि त्यात
चित्रविचित्र, विक्षिप्त वाटणारी रंगीबेरंगी सोळा शिल्पकारंजी होती. चुंबन
घेण्यासाठी आवळलेले लालबुंद ढबाडे ओठ मधूनच कारंजाची पिचकारी उडवत होते, एक
सापळ्यासारखा आकार, एक विदूषकी आकार. एक आग ओकणारा पक्षी, कोल्हा, साप, बेडूक...
कायकाय... आयगॉर स्ट्राविन्स्की या संगीतज्ञाच्या सन्मानार्थ ही हलती कारंजी या
उथळशा जलाशयात बांधली आहेत. जागेच नावच प्लेस स्ट्राविन्स्की. बटबटीत असूनही आपण
त्यांच्याकडे कां पहात रहातो कळलं नाही मला. पण काहीतरी नजरबांध आहे त्यात.
जलाशयाच्या भोवतीने ग्रेनाईटचा कठडा आहे. तिथे खूप मुलंमाणसं मजेत पाण्याकडे बघत
खातपीत बसतात. तीनही बाजूंनी रेस्त्राँची गर्दी आहे. बाहेर अगदी जलाशयापर्यंत पाच
फूट अंतर सोडून खुर्च्या टाकून बसतात. छान कॅनपी, छत्र्या आहेत. पलिकडे सेंट मेरी
चर्च आहे. त्याच्या शेजारच्या इमारतीवर एक भला मोठा विदूषकी
चेहरा रंगवलाय. श्शूः असं तोंडावर बोट ठेवून बजावणारा... आणि त्याही पलिकडे एका
इमारतीच्या अगदी वरच्या दोन मजल्यांवर भग्न, विचारमग्न असा चेहरा
ग्राफिटीपेंन्टिंगमधे रंगवलाय. केवढा तरी मोठा. काळजाचा ठाव घेईल अशी भग्नता,
निमग्नता.
तिथून रमतगमत चालत बाहेर पडलो. जवळच असलेल्या
बसस्टॉपवरून माँतेमार्त्र-सॅक्रीकूरला जाणारी बस मिळाली. सॅक्रीकूरच्या पर्वतीच्या
पायथ्याशी असलेला रस्ता बुलेवार ड क्लीशी हा एक मोठा खरीदारीचा
रस्ता आहे. सुप्रसिध्द नाइटक्लब मूलाँरूजही इथेच. इतरही सेक्सशॉपिंग बरंच. पण
तरीही कुठेही गलिच्छपणा आणि गलिच्छ वृत्तीचेही दर्शन होत नाही. सारं आपापल्या
ठिकाणी सभ्यपणेच. रस्त्यावरून माँतेमार्त्रवर फनिक्यूलर ट्रेनने जाता येतं. पण आता
माझ्यात फनिक्यूलरच्या स्टेशनपर्यंत चढत जायचंही त्राण नव्हतं. आणि टॅक्सी मिळाली.
सॅक्रीकूरच्या टेकडीचे वैशिष्ट्य अद्वितीय असे आहे. पॅरीसमधली ही सर्वात उंच जागा.
पॅरीस कम्यूनच्या क्रांतीकारी घटनेचे जन्मस्थान आणि पराभवस्थानही. आणि तिच्या
टोकावर आहे बॅसिलिका ऑफ द सॅक्रेड हार्ट ऑफ पॅरीस. पवित्र हृदयाचं माहीत नाही पण
त्या सुंदर वृक्षराजीने नटलेल्या टेकडीने कलेचे प्राण मात्र जपले आहेत. या परिसरात
कित्येक कलाकार येऊन राहून गेले, काम करून गेले, रेनॉर, मोडिग्लियानी, उट्रिलो,
पिकासो हे चित्रकार इथे वास्तव्य करून काम करत. व्हॅन गॉच्या सुरुवातीच्या काळात
तो आपला लाडका भाऊ थिओ याच्या घरी येऊन राहिला होता, त्या थिओचं घर
माँतेमार्त्रमधेच होतं. तो स्वतः आर्ट-डीलर होता आणि त्या वेळचे श्रेष्ठ, नामांकित
कलाकार, पिसारो, गॉगिं, टुलूज-लॉत्रे यांच्याशी व्हॅनच्या भेटीगाठी त्यानेच करून
दिल्या. व्हॅन गॉची माँतेमार्त्रची चित्रे प्रसिध्द आहेत. पिकासोने त्याचा सर्वात
प्रसिध्द मास्टरपीस इथेच केला.
पण याआधी म्हणजे अगदी दुसऱ्यातिसऱ्या शतकापासून
ग्रीकांनीही या पर्वतीवर वस्ती केली होती याचे पुरावशेष इथे सापडले आहेत. एवढंच
काय एका नामशेष झालेल्या प्राचीन प्राण्याचा सांगाडाही इथे मिळाला होता. आणि हे
सारे काही इथे चांगल्या प्रकारे जतन करून ठेवण्यात आले आहे. भाग्यवान ते, ज्यांना
इथे भरपूर वेळ देणे शक्य होते.
अर्थात यातलं काहीही आमच्या टॅक्सीवाल्याला माहीत
नव्हतं किंवा सांगता येत नव्हतं. आम्ही फक्त त्या शांत, सुंदर नगरीचं सौंदर्य
टिपून घेतलं आणि उसासलो. त्याने आम्हाला थेट बासिलिकापाशी नेऊन सोडलं. पायाची ताकद
पुरवून वापरायची होती, त्यामुळे बासिलिका बघण्यात वेळ घालवायचा नव्हताच. एका
चर्चसारखं दुसरं... तिथला ऑर्गन खूप प्रसिध्द आहे म्हणे. पण बाहेरून चर्च तसं
साच्यातलंच.
तिथून दिसणारं दूरवर पसरलेल्या पॅरीसचं दृश्य
सुंदर होतं. समोरच्या उतारावर उलगडत गेलेल्या हिरवळीच्या पायऱ्यांवर गर्दीचगर्दी
बसलेली. थोडासाच वेळ तिथं थांबून आम्ही प्लेस डी तेर्त्रेच्या शोधात निघालो. वाटेत
एक गायकांचा ग्रुप छान गाणी म्हणत होता. युरो नि सेंट्स गोळा करत होता. जोरदार
गाणं होतं. तिथून सुवेनिर शॉप्सच्या गर्दीतून वाट काढत प्लेस ड तेर्त्रे पोहोचलो. १६व्या शतकापासून गजबजत आलेला माँतेमार्त्र गावातला
हा चौक आता चित्रकारांचे खास स्थान झाला आहे. चारीही बाजूंनी झालेल्या रेस्त्राँ
आणि आर्ट शॉप्सच्या मधोमध असलेल्या एका विस्तीर्ण चौकात चित्रकार आपली चित्रे आणि
इझेल्स, रंग, कुंचले घेऊन बसले होते. ते सारेच्या सारे व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन
इथे आलेलेच होते. समोर बसून स्वतःचं चित्र काढून घेण्याची क्रेझ बरीच होती. आणि
पोर्टेट चित्रांचा व्यवसाय जोरात होता. पण त्याशिवाय वेगळी चित्र काढणारेही खूप
होते. आणि काही चित्रकार तर पुढे कधीतरी भविष्यात चांगले प्रसिध्द होतील हे जाणवत
होतं.
तिथल्या ल क्रीमलेरे नावाच्या रेस्त्राँकडे बोट
दाखवत धनंजय सांगू लागला. मी मागच्या वेळी म्हणजे १९८४ मध्येही इथे आलो होतो. हे
१९०० साली सुरू झालेले एक रेस्त्राँ. चित्रकारांच्या, संगीतकारांच्या वर्दळीमुळे
हे रेस्त्राँ फार फॅशनेबल झाले. रात्री तिथे कॅबरेही चालतो. फार सुंदर अशी एक
खाजगी बाग मागच्या बाजूला आहे. अजूनही जुनी सजावट नीट राखून ठेवलेली. नर्तकींची
जुनी चित्रे लावून ठेवलेली. आम्हाला जेवायचे नव्हते. पण नुसतं आतून पाहायचंय
सांगितल्यावर तिथल्या वेटर्सनी अगदी आनंदाने स्वागत केले. आतून फिरू पाहू दिले. मी
इथे १९८४मधे आलो होत असं धनंजयने सांगताच तो तरूण मुलगा म्हणाला- अरे वाः तेव्हा
तर मी जन्मलोही नव्हतो. मर्सी बुकू...
बराच वेळ चित्रे पाहात फिरलो. विकत घेता येत
नाहीत म्हणून थोडी चुकचुकही वाटलीच. तिथून पाय निघणं कठीणच होतं. पण शेवटी
पायांनीच निषेध नोंदवला. बाहेर पडून एका निवांत कॅफेच्या अंगणात शिरलो. उंचच उंच
लिन्डेनच्या छायेत बसून कॉफी, लेमन टी वगैरे घेतलं. कोपऱ्यावरच पेटिट ट्रेन उभी
होती. ती खालपर्यंत जाते असं कळल्यावर बसलो. टॅक्सीपेक्षा महाग होती. पण ड्रायवर
माहिती देत होता. रेनॉर कुठे राहिलेला, थिओ गॉचं घर कुठे, म्युझियम कुठे आहे,
सिमेटरी पहा... इथे भलेभले चित्रकार चिरविश्रांती घेत आहेत वगैरे सांगत होता.
पटकनच संपली ती राईड. आणि आम्ही पुन्हा त्या कलेच्या प्रांतातून जमिनीवर आलो.
हा पॅरीसमधला शेवटचा दिवस होता. टॅक्सी घेऊन घरी
परतलो. वाटेत उद्या जिथे यायचंय ते गेर नॉर्ड डि पारी चं स्टेशन लागलं. पॅरीस अजून
खरं म्हणजे पावसुध्दा बघून झालं नव्हतं. इथे रहाणारांचं तरी ते कधी बघून होत असेल
का माहीत नाही... इतकं प्रचंड, इतकं खचाखच आहे ते.
त्या रात्री एका फाईन डाईन रेस्त्राँमधे जेवलो.
अगत्याने चौकशी करणारी सुंदरी वेट्रेस अख्खा ब्लॅकबोर्ड मेन्यूकार्ड म्हणून उचलून
आणून समोर धरत होती. पण जेवण खरंच छान होतं. आम्हाला जाईपर्यंत उशीर झालेला
त्यामुळे फ्रेन्च रोस्ट लॅम्ब खायची सुश्रुतची इच्छा अपूर्ण राहिली. ते संपून
गेलेलं.
इथली निदान या टप्प्यातली अखेरची रात्र म्हणून
हुरहुरतच झोप लागली.
No comments:
Post a Comment