Monday, March 2, 2015

नॉत्रदाम आणि तिथून बाहेर- हुश्श...

सेनमधल्या फेरीनंतर संध्याकाळी- म्हणजे रात्रीच परतलो... रात्री साडेनऊपर्यंत टकटकीत उजेड. त्यामुळे जेवायची वेळ झाली हे भान सूर्य नव्हे घड्याळच देत होतं. तर परतताना सारे कॅफे गच्च भरलेले. लोक बीअर, वाईन्स, पीत, वाडगा-वाडगाभर सलाड्स आणि मांसल पदार्थ खात मस्त बसलेले दिसत होते. आम्हीही कोपऱ्यावरच्या ऍग्नेस रेस्तराँमध्ये शिरलो.  बॉन्स्वा... काहीबाही खाल्लं. सुश्रुतने आनंदात एकदम रसदार बीफ स्टेक खाल्ली. आम्ही चिप्स आणि चिकन. हा कॅफे चालवणारे सगळे तरुण मालकच वेटर म्हणून कामं करीत होते. तिथल्या देखण्या हसतमुख मुलीने दहावेळा विचारलं की सगळं ठीक आहे ना. मर्सी मर्सी... सगळं छान आहे बयो.
घरी परतलो. एसीशिवाय, पंख्याशिवाय झोपणं हा एक अनुभव. उन्हाळ्याचे दिवस कमी असल्यामुळे कोणीच पंखे वगैरे लावून घेत नसतात. तेवढी एक गैरसोय उन्हाळ्याच्या मोसमात होते खरी. खाली तीनचार रेस्तराँ होती. रात्रभर लोकांच्या गप्पाटप्पा सुरू होत्या. पण आवाजाची मर्यादा उलटत नव्हती. शांतताच इतकी होती की त्यांचं साधं बोलणंही स्पष्ट ऐकू येत होतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा निघालो तेव्हा ल ओपन बस घ्यायचं ठरवलं. बिग बस, ल ओपन बस अशा दोन तीन दिवसांची एकसाथ तिकिटं देणाऱ्या हॉप ऑन हॉप ऑफ बसेस पारीमध्ये सतत वारी करीत असतात. रमतगमत निघालो. आमच्या रहाण्याच्या ठिकाणापासून बॅस्टिल चौकापर्यंतचा रस्ता चालत साताठ मिनिटांचा असेल. वाटेत एक छान बेकरी होती. तिथल्या इतके छान क्रोसाँ कुठेच खाल्ले नाहीत. तिथून क्रोसाँ घेऊन पुढे जाऊ म्हटलं. आतमधे रांगेत उभे राहिलो. पॅरीसमध्ये एक- कुठेही शिस्तीत रांग असते. साध्या छोट्याशा दुकानातही लोक विक्रेता आधीच्याशी बोलणं संपवून आपल्याकडे वळण्याची शांतपणे वाट पाहात असतात. एकंदर सावकाशी असते. तिथे आमची खरेदी झाली आणि लक्षात आलं की तिथे एक उंच माणूस जरा विचित्रच चेहरा करून एका हाताचा तळवा उचलून खांदे उडवत होता. हा काय प्रकार ते लक्षात आलं नाही. तेवढ्यात तो बाहेर आला आणि मग व्यवस्थित मागण्याचा तळवा पुढे करून उभा राहिला- पण हात अगदी किंचितच पुढे हं, फार पुढे पसरलेला नव्हता. तेव्हा कळलं तो एक अनिकेत भिकारी होता. तिथून थोड्याच अंतरावर त्याची गादी, ब्लँकेट वगैरे पडलेलं. धनंजयला हा पैसे मिळाल्यावर काय करतो याची उत्सुकता वाटली. त्याने त्या बाबाला काही नाणी दिली. मर्सी म्हटल्यासारखं पुटपुटून तो तडक त्या क्रोसाँवाल्या बेकरीत आत शिरून रांगेत उभा राहिला. हः!
पुढे आलो. बॅस्टिल चौकाला संपूर्ण ओलांडून पलिकडे बससाठी जायचं होतं. तिथलं ऑपेरा हाऊस खुणावत होतं. मस्त बांधलेलं काचांनी क्लॅडिंग केलेलं भव्य ऑपेरा हाऊस. रिकाम्या दिसणाऱ्या रस्त्यावरून बिनदिक्कत पळत ओलांडायची मुंबईकर सवय जागी झाली. आणि पोरगं ओरडलं- आई, यू हॅव टु वेट फॉर सिग्नल. हे काय मुंबई आहे काय?’ ... छे रे बाबा. चुकूनही मुंबई वाटत नाही कुठेही. काचेच्या पार्टिशनच्या बसस्टॉपच्या मागच्या बाजूला तिथं थांबणाऱ्या बसरुट्सचे मॅप्स होते. पण आम्हाला ल ओपन बस हवी होती. ती आली आणि दोन दिवसांचं तिकिट घेऊन चढलो. आत इअरफोन्स कानात घालून रस्त्याने जाताना लागणाऱ्या आसपासच्या इमारतींची त्यांच्या ऐतिहासिक महत्त्वाची माहिती दिली जात होती. भाषा आपण तिथंच पॅनेलवर निवडायची. सात भाषांतून माहिती द्यायची सोय होती. हेन्ऱी द फिफ्थ कुठे उतरला होता, कोणते लेखक कुठे रहात होते, कोणते चित्रकार कुठे रहात होते, कोणते शिल्पकार कुठे रहात होते. या इमारतीचं महत्त्व काय, ती किती जुनी, कधी पुनर्बांधणी झाली वगैरे माहितीची घनघोर बरसात होत होती. जवळपास एकसारख्या दिसणाऱ्या, पण शिल्पाकृतींची विविधता असलेल्या, वळवलेल्या लोखंडी चित्राकृतींचे सज्जे असलेल्या त्या इमारती. साचेबंद तरीही आपल्याला नवलाईच्या वाटणाऱ्या. बरीचशी होटेल्स, काही निवासी, काही दुकानांनी भरलेल्या... उफ्फ्... डोक्यात काहीच टिकून रहाणार नव्हतं. अखेर नॉत्रदामच्या स्टॉपला उतरलो.
आता आमच्यासारख्याच टुरिस्टांच्या गर्दीत शिरलो. ही भली मोठी रांग नॉत्रदामच्या प्रशस्त आवारात वळणावळणांनी फिरलेली. बाहेर शार्लेमान (Charlegmane) या आठव्या शतकात ख्रिस्ती धार्मिक राजसत्ता स्थापन करणाऱ्या राजाचा पुतळा आहे. (मला तर तो लॉर्ड ऑफ द रिंग्जमधल्या नाझ्गुलचा पुतळा वाटला J दृष्टी तशी सृष्टी). रांग हां हां म्हणता पुढे सरकत गेली. नॉत्रदाम इतकं भव्य आहे की त्याच्या पोटात सगळे गप्पकन जात होते. दरवाजापासून त्यातील शिल्पकलेचा अनुभव येतो. सुंदर भव्य लाकडी दार, त्यावर धातुची नक्षी जडवलेली, दाराच्या भोवती कमानींवर विविध ख्रिस्ती संतांची शिल्पे,  एका नर्तकीच्या मागणीपायी राजाने केलेल्या शिरच्छेदानंतर हातात शिर घेऊन उभा असलेला सेंट जॉन द बाप्टिस्टही तिथेच कोरलेला. ते पाहायला फार भयानक वाटतं. ही प्रवेशद्वारावरची शिल्पे काही फार देखणी नव्हती. कलाकारांनी नव्हती कोरलेली ती. कुशल कारागिरांचे काम होते ते. ठीकठाक.  
केवढी संपत्ती वापरली गेली आहे हे चर्च निर्माण करण्यात ते पाहिल्याशिवाय समजण्यासारखे नाही. या चर्चचे बांधकाम ११६३ मध्ये सुरू झाले आणि १८६० मध्ये संपले.  मधल्या १३५० ते १७८० या काळात काम बंद राहिले. १७९०मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात त्याचे बरेच नुकसान केले गेले. पण नंतर पुन्हा एकदा १८४५नंतर पॅरीसचे महत्त्वाचे स्थळ म्हणून त्याचे जतन संवर्धन हाती घेण्यात आले. आणि मग पुढल्या ऐंशी वर्षांत ते पूर्णत्वास पोहोचले. आता त्याचे सातत्याने जतन संवर्धन होत असते. चर्चच्या बांधणीच्या टप्प्यांचा संपूर्ण इतिहास चर्चमधेच देखणेपणाने मांडलेला आहे हे विशेष. गॉथिक शैलीतल्या या चर्चच्या बांधणीबद्दल भरपूर माहिती नेटवर आहे. भेट देण्यापूर्वी ती वाचून जावी हे बरे.
अगदी अलिकडेपर्यंत चर्चच्या बेलटॉवरवर जाता येत असे. आम्ही गेलो तेव्हा त्यावर प्रवेश नव्हता. सुवर्ण, रत्ने, जडावकामाच्या अनेक धार्मिक महत्त्वाच्या वस्तू एका वेगळ्या दालनात होत्या, आणि त्या पाहाण्यासाठी वेगळे पाच युरोंचे तिकिट होते. ते मात्र पाहिले. खजिनाच होता तो अमोल धातूंचा, रत्नांचा, रत्नजडित सुवर्णचषक आणि क्रॉसयुक्त कलाकृतींचा. नेपोलियनचा झगा, पोपचा झगा वगैरे गोष्टीही मांडून ठेवलेल्या. साऱ्या चर्चभर अमोल अशी तैलचित्रे, शिल्पे विखुरलेली. चांदीचे चषक, मेणबत्त्यांचे स्टॅण्ड्स अगणित होते. तसे हे एक म्यूझियमच आहे. काही शिल्पे अगदीच सुमार आहेत. मैं भी घुसन टाईपच्या शिल्पकारांनी धार्मिक भावनांच्या आधाराने चर्चचा पैसा ओढून घेतलाय किंवा चर्चने त्या शिल्पांच्या निमित्ताने काँग्रेगेशनकडून किंवा राजाकडून पैसा ओढून घेतलाय हे कळतं.
एक अवाढव्य पितळी होली क्रॉस मध्यावर आहे. आणि त्याच्या पायथ्याशी वेदना सोसून मृत किंवा मृतवत् पडलेल्या येशूच्या देहाला मांडीवर घेऊन शोकमग्न मुद्रेतील मेरीचे शिल्प. संगमरवरातून संगमरवर खोदून काढण्याची आणखी एक कमाल... उंचच उंच गेलेले कमानदार छत आणि रंगीत काचांच्या चित्रांतून झिरपणारा प्रकाशाचा खेळ थोडा वेळ पाहायला बरा वाटतो. हे सारे पाहून लोकांना आध्यात्मिक अनुभूती येत असेलही कदाचित्, आम्हाला मात्र या चर्चमध्ये ओतलेला पैसा, प्रचंड संपत्तीचा दिखाऊ डामडौल यामागे धर्माच्या राजकारणाचे, सत्ताकारणाचे रक्तरंग मिसळले असतील याचा थोडासा अंदाजच येत होता. चर्चजवळच्या सत्तेने, पैशांनी कलांचा विकास झाला खरा, स्थापत्याचाही विकास झाला काही प्रमाणात... पण. हा पण आपल्या कोरीव मंदिररचनेत आडव्या येणाऱ्या पण इतकाच ठाशीव आहे. खजुराहो पाहातानाही हाच प्रश्न सतावत होता. सौंदर्य आहेच- पण ते निष्कलंक नक्कीच नाही. आणि कलंक देवाच्या आधाराने पसरत जातात तेव्हा मनाला डागण्या बसतातच.
चर्चमधे ठिकठिकाणी मेणबत्त्या पेटवण्यासाठी स्टॅण्ड्स आहेत. अंधारलेल्या वातावरणात अनेकानेक उजळत्या मेणबत्त्या सुंदरच वाटतात. काचेच्या पेल्यातली मेणबत्ती पाच युरोला विकत घेऊन तिथेच लावायची असते. आणि असा समज आहे की इथे मेणबत्ती पेटवून पुन्हा येण्याची इच्छा जर प्रवाशाने केली तर त्याला परत यायची संधी मिळतेच मिळते. आता असा समज असल्यानंतर मी मेणबत्ती पेटवणार नाहीच हे ओघानेच आलं. तसं न करता परत जाता आलं तर चर्चमधे जावंसंही वाटणार नाही फार तर चर्चची मागची बाजू, जिथं फ्लाइंग बट्रेसेसनी (आधारमुळांसारखी रचना) ढाच्याला आधार दिला आहे तो भाग बघून जाईन कदाचित्.
या चर्चमधल्या रंगवलेल्या काचांच्या खिडक्यांचे नक्षीकाम खूपच आवडले. चर्चमधल्या सुवेनिर शॉपमधून हाताने रंगवलेल्या गोल काचेच्या खिडकीची प्रतिकृती विकत घेऊनच टाकली. मस्तच.

भव्यतेचा नक्कीच पण संपूर्ण सौंदर्याचा नाही असा काहीसा बेताचा अनुभव दिला या चर्चने. आठशे वर्षाच्या इतिहासाची साक्षीदार असलेली ही भव्य वास्तू, पण काही वेळाने त्या चर्चच्या आत रहाण्याचा कंटाळाच जाणवला मनाला. बाहेर पडून स्वच्छ लख्ख उन्हात निळ्याशार आभाळाखाली आल्यावरच प्रसन्न वाटलं.

No comments:

Post a Comment