Monday, March 2, 2015

अॅमस्टरडॅमकडे... प्रथमदर्शनीच जान निसार



पॅरीसहून निघाल्यावर साडेतीन तासांत अमस्टरडॅमला पोहोचलो. हेसुध्दा एक भव्य तिमजली स्टेशन होतं. भरपूर एलेव्हेटर्स, एस्केलेटर्स असल्यामुळे, आणि आतल्या सर्व फलाटांच्या जमिनी गुळगुळीत असल्यामुळे कितीही जड सामान घेऊन गेलं तरी काहीही त्रास जाणवणार नाही अशी व्यवस्था. बाहेर आलो तोच अमस्टरडॅमच्या स्वच्छ हवेचा प्रसन्न श्वास जाणवला. रांगेत उभं राहून सहजपणे टॅक्सी मिळाली.
जिथे जायचं होतं तो भाग गाठायला वॉटरफ्रन्ट म्हणजे अमस्टरडॅममधे घुसलेल्या उपसागराचा भाग भुयारी मार्गाने ओलांडून जायला हवं होतं. झुप्पकन् आम्ही त्या भल्यामोठ्या जलाशयाच्या पोटाखालून पलिकडे आलो.  टॅक्सीवाल्या तरुणाने गप्पा मारतमारत न चुकवता आम्हाला हेत् ब्रीड नावाच्या भागातल्या आमच्या इमारतीपाशी आणून सोडलं. म्हणाला, इथे गेला महिनाभर पावसाने वैताग आणलाय. कधीही येतो. दोन दिवस पाऊस मग दोन दिवस गायब. काही कळत नाही.
आम्ही बीएनबीमार्फत एक घर घेतलं होतं. फेबियन गॉन्डॉर्फ नावाच्या तरुणाचं. त्या इमारतीत पंधराव्या मजल्यावर होतं ते.
गेलो तर फेबियन स्वागतासाठी हजर होता. सव्वासहा फुटी देखणा काळा तरूण होता तो. किकबॉक्सिंगमधला राष्ट्रीय चॅम्पियन. त्याच्याशी हात मिळवताना एक बॅग त्याच्या फ्लॅटच्या बाहेरच राहिली. आम्ही त्याच्याशी आतमधे शिरून बोलून, सगळ्या सिस्टिम्स समजावून घेईपर्यंत कुणातरी चोराने ती बॅग उघडून त्यातल्या चारपाच पॅकबंद वस्तू लांबवल्या. बाकी त्या बॅगेत, मसाले, भाजणी, लोणची असलंच कायकाय होतं. गेला एक माऊस, एक कीबोर्ड, आणि एक फास्ट ट्रॅकचं घड्याळ. फेबियन गेल्यानंतर आमच्या लक्षात आलेलं. बाहेर जाऊन पाहातो तर बॅग उघडी पडलेली. आम्ही पाहात होतो तोच समोरच्या फ्लॅटचं दार उघडलं. आणि त्यातला एक तरुण माणूस बाहेर डोकावत म्हणाला, मी आलो तेव्हा ती उघडीच पडलेली. मी काही घेतलं नाही, पण कुणीतरी घेतलं हां... हाच चोर असावा. नाहीतर युरोपमधे बाहेरचे आवाज ऐकून कुणी दरवाजे उघडत नाही. बहुतेक आणखी काही काढता येतंय का पाहायला आला असावा. पण तिथं करण्यासारखं काहीच नव्हतं. फेबियनच्या कानावर घातलं. त्याला वेगळीच चिंता पडली- आम्ही बीएनबीवर आता त्याचा रिव्यू खराब करू की काय... त्याला सांगितलं, बाबा रे- आमची चूक, आम्ही विसरलो. तुला कशाला दोष देणार. चिलॅक्स. तरीही तो सेक्युरिटीकडे चौकशी वगैरे करत राहिला. पहिलाच दिवस वाईट अनुभव आला म्हणून जरासे बिचकलोच आम्ही. पण नंतर मात्र अमस्टरडॅमवर खूषच झालो.
फेबियनचं घरही मस्त होतं. शुभ्र फर्निचर, ग्रे कार्पेट... निवडक वस्तू. या बाबाच्या घरात मात्र एकही पुस्तक नव्हतं. किचनमधे तेवढी काही रेसिपी बुकं होती. आणि मुख्य म्हणजे ओटा, सगळे स्विचेस, शॉवर स्टॅन्ड, हे त्याच्या उंचीप्रमाणे सोयिस्कर अशा उंचीवर होते. पण किचन इतकं छान सुसज्ज होतं. की इथे स्वयंपाक करायला खूप बरं वाटलं. भरपूर भांडी, क्रोकरी, कटलरी. आणि लागलं तर वापरा म्हणून सामानही भरपूर होतं. लांबलचक गॅलरीतून दिसणारं दृश्यही सुंदर मनोहर होतं. खाली एकीकडे भला मोठा पार्किंग लॉट, त्यातही भरपूर झाडं आणि एकीकडे एक भलं मोठं उद्यान. खालून सतत सीगल्सच्या हाका येत, बदकांचा कलकलाट चाले. दूर क्षितिजावर समुद्राची चमचमती रेघ दिसत असे. आणि रस्ता ओलांडला की स्टेशनला थेट घेऊन जाणाऱ्या बसेस होत्या. जवळच जंबो नावाचा ग्रोसरी मॉल होता. एक देखणा शॉपिंग काँप्लेक्स होता.

मागच्या बाजूला एक लांबलचक फिरत जाणारी दुमजली इमारत होती. त्यात ऑफिसेस होती, आर्टिस्ट सेंटर होते. एकंदरच देखणा परिसर होता तो. गेलो त्या दिवशी आम्ही समोरच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधे चक्कर मारली, जम्बोमधे जाऊन येते चार दिवस लागतील असं दाणापाणी, ताजी फळं, ताजा ब्रेड, मासे, चिकन वगैरे घेऊन आलो. रात्री घरी जाऊन फक्त मासे तळले शिजवले आणि जेवून झोपलो. उद्या रिज्क्सम्युझियमला जायचं ठरलं होतं.

No comments:

Post a Comment