Monday, March 2, 2015

पारीच्या परीचा निरोप

दुसऱ्या दिवशी एमिली म्हणजे या घराची मालकीण आली. एमिली अगदी छान साधीशी मुलगी होती. आम्ही निघेपर्यंत थांबून गप्पा मारत राहिली. ती नाट्यअभिनेत्री होती. आणि पॅरीसच्या एका उपनगरात आपल्या बॉयफ्रेन्डबरोबर रहात होती. पण या बॅस्टिलमधल्या घरावर तिचा खूप जीव होता. तिचे आईवडील आणि तिची बहीण यांच्यासह तिचं आयुष्य इथेच गेलेलं. म्हणूनही हे घर तिला प्रिय होतं. पण लोकेशनमुळेच बीएनबी मधून आमच्यासारखे लोक इथे येत आणि चांगले पैसे मिळत म्हणून ती लांब जाऊन राहिली होती. म्हणाली आत थोडे दिवस इथेच राहीन आणि मनासारखं जगेनवागेन. तिला मुंबईला यायचं आमंत्रण दिलं. बॉलिवुड आणि मुंबईतलं थिएटर याबद्दल तिला ऐकून माहीत होतंच. बॉलिवुड मूव्हीजमधे कसा नाच करतात ना- म्हणून तिने हातपाय तंगड्या उडवत एक नाच केला आणि हसत सुटली. सगळेच खदखदून हसलो तिच्या नाचावर आणि बॉलिवुडच्या नाचावरही.
टॅक्सी मागवून घ्यायला तिनेच मदत केली. तिला द लिटल प्रिन्सचा एक मग भेट दिला त्यावर मनापासून खूष झाली. कधीतरी नक्की येईन मुंबईला म्हणाली.
तिचा निरोप घेऊन आम्ही आलो गेर डी नॉर्ड स्टेशनला. इतकं सुंदर आणि भव्य स्टेशन होतं हे. स्वच्छ आणि प्रशस्त. थॅलिस नावाच्या कंपनीच्या फास्ट आणि सुखकर ट्रेन्स असतात. वाट पाहात थांबलो. वेळेवर ट्रेन आली. सगळं शांतपणे, निवांतपणे पार पडलं. स्टेशनवर अलोट गर्दी असा प्रकारच नव्हता. एक राजस दिसणारं वृध्द जोडपं होतं. कुणी तरी ट्रेनने येण्याची वाट पाहात होते. त्यांची मुलं नातवंडं ट्रेनने आली तेव्हा त्यातल्या वृध्देचे डोळे पाणवले आणि नाक लालेलाल झालेलं दिसलं. सगळीकडचे धागे सारखेच गुंततात वाटलं...

पॅरीसचा निरोप घेताना परत येऊ आम्ही म्हणूनच हात हलवला.

No comments:

Post a Comment