शॉन्डेमार्सच्या मागच्या बाजूने जाऊन आय़फेल
टॉवरला पोहोचलो... आणि वाटलंच- आः आय़फेल टॉवरला पोहोचलो. ते आय़फेलला तोल्स्तोयने
फेल्युअर वगैरे म्हणणं उगीच आपलं चघळायला ठीक आहे. पण तो आपल्याला खाऊन टाकतो आणि
तरीही आपण त्याला गिळत जातो. त्या प्रचंड धुडाच्या अंगाखांद्यावरून, पोटातून चढत
किंवा लिफ्टने जायची सोय आहे. आम्ही आधी पहिल्या मजल्यावर, मग शेवटच्या टोकावर
गेलो. त्या गुस्ताव बाबाने सगळ्या जगाला एक भला मोठा मापदंड उभारून दिलाय.
पोलादाच्या त्या रचनेतलं स्वच्छ, कातीव सौंदर्य पहाता आलं पाहिजे. तिथून पॅरिसचा
संपूर्ण परिसर डोळ्याच्या कवेत घेता येतो हे तर आहेच. पण त्यातली अंतर्गत रचना,
क्लिष्ट तरीही स्वच्छ गुंतागुंत विज्ञानतंत्रज्ञानाबद्दल आदर बाळगणाऱ्या मनाला
नक्कीच मोहवून जाते.
तिथून पॅरिसचा परिसर पाहाताना, सीन नदीवरची
बोटींची लगबग पाहाताना मनात कायकाय उंचबळतं ते खाली आल्यावर लक्षातही रहात नाही
अशी तरलता त्यात आहे. आणि तरीही तो अनुभव कधीही विसरता येणार नाही.
आय़फेलचं टॉवरचं वर्णन, इतिहास, माहिती सारंसारं
खूप लोकांनी लिहून ठेवलंय. त्यात मी काही भर घालावी असं नाही. पण आकाशाच्या इतक्या
जवळ निवांतपणे जाऊ देणारा तो एक मस्त अनुभव आहे एवढं नक्की.
कितीतरी वेळ मनःपूत पाहात राहिलो होतो. इतक्या
उंचीवरून जग पाहाताना परिप्रेक्ष्य बदलून जातंच.
अगदी वरच्या लेवलच्या खालच्या बाजूला कुठल्या
दिशेने कुठलं शहर आहे त्याची एक पट्टी लावलेली आहे. त्यात दिल्ली होती मुंबई
नव्हती म्हणून थोडकंसं वाईट वाटलं. गुस्ताव आय़फेलचे फोटोग्राफ्स, आय़फेलच्या
उद्घाटनाच्या वेळचे, गुस्ताव आय़फेलसाठी तयार केलेल्या खोलीचे असे अनेक फोटोग्राफ्स
तिथे लावले होते.
खाली आलो. पहिल्या मजल्यावरून सुश्रुत पायऱ्या
उतरून आला. खाली एक सुंदरशी बाग आहे. त्यात तळं आहे, बदकं आहेत, मासे आहेत.
उंचीवरून जाऊन आल्यानंतर आपण किती पटकन् मातीपाण्याशी नातं जोडून घेतो त्याचा सहजच
अनुभव आला.
प्रचंड गर्दी होती. सोमवार असला तरीही सुट्ट्या
सुरू होत्या. माणसं मजेत फिरत होती. आनंदात फिरणारी, प्रेमात असलेली माणसं खरंच
खूप छान दिसतात. आय़फेल टॉवरच्या उंचीचा एक ठसा मनाच्या उंचीवरही उमटून जात असावा.
सगळी गर्दी खूप शिस्तीने वर जात होती, खाली येत होती, बारा वाटा होत होती.
आयफेल टॉवरच्या शॉन्डेमार्स भागातून पुन्हा एकदा
प्रेमकुलुपवाल्या एका पुलावरून सेन ओलांडून समोरच्या ट्रोकॅडीरोकडे आलो. पालाइस ड
शायलॉ नावाच्या भव्य प्रासादाच्या इमारतीच्या दोन पाखांच्या मध्ये अनेक
पायऱ्यापायऱ्यांची रचना आहे. आणि मग ती एका लांबलचक सुंदर कारंजाकडे उतरते. दोन
बाजूला हिरवळीचे उतार. आय़फेल टॉवरवरून पाहातानाच या कारंजाने मोहवून खुणावले होते.
चालतचालत तिकडे जाऊन बसलो. पायऱ्यांवर काही तरुण मुलंमुली गिटार लावून नाच करत
होती. शिस्तीचे पदन्यास होते. कारंजाच्या मधोमध तोफा लावल्यासारखी रचना होती.
अचानक त्यातून पाण्याचा धबाबा वर्षाव सुरू झाला. बारीक तुषारांच्या मोत्यांचा पडदा
वाऱ्यावर हेलकावत होता. आकाशात थोडे ढग होते, थोडं ऊन थोडी सावली. त्यात ते पाणी
डोळे निववत होतं. खूप लोक तिथे बसून गप्पा मारत होते. कारंजाच्या अगदी पुढच्या बाजूला
पाण्यात उतरायलाही परवानगी होती. लहान मुलं आणि त्यांचे आईबाबा डुंबत होते. मस्त.
मग सेनच्या काठाकाठाने थोडं चालत, खालची
बोटहाउसेस थोडी हेव्याने पाहात पुढे गेलो. बस पकडून हॉतेल ड व्हिलेपाशी उतरलो.
तिथून पुन्हा मेट्रोने बॅस्टिलला गेलो. जरा लवकरच घरी पोहोचलो. मग पुन्हा बाहेर
पडलो. विक्टर ह्युगोचं घर पाहायचंच होतं. भराभर पावलं उचलत हिप्पोपॉटॅमस नावाच्या
त्या कॅफेच्या शेजारच्याच रस्त्याने चालत गेलो. तिथे केलेलं म्युझियम पाहायला
मिळणारच नव्हतं. पण परिसर तर पाहून झाला असता.
मॅसन ड विक्टर ह्युगो म्हणून प्रसिध्द असलेली ही
प्लेस रॉयेल नावाची जागा म्हणजे एका विस्तीर्ण लंबचौकोनी बागेच्या भोवती
बांधलेल्या बत्तीस इमारतींचा परिसर आहे. सतराव्या शतकात तेराव्या लुइच्या
लग्नासाठी हा जागा तयार करण्यात आली होती. त्यानंतर या परिसरात फारसा बदल झालेला
नाही. विक्टर ह्युगोशिवाय इथे नंतर बरेच कलावंत, लेखक राहून गेले. अगदी शांत,
साधासुधा पण काही सुंदर कलावस्तूंची दुकाने असलेला हा परिसर आहे. आम्ही पोहोचलो
तोवर अंधार पडत आलेला. पण तरीही विक्टर ह्युगोच्या घराचं प्रवेशद्वार आणि खिडकी
पाहिली. फोटू काढला आणि परतलो.
वाटेत एका बसस्टॉपपाशी आपल्या लहान मुलाला घेऊन
भीक मागत बसलेली आशियाई बाई दिसली. अंगावर पंजाबी ड्रेस होता. झोपेतच होती.
क्वचितच असे इतक्या मुख्य रस्त्यावर निराश्रित भिकारी दिसतात.
बॅस्टिलचा चौक रंगात आलेला. सगळे कॅफे छान
उत्फुल्ल दिसत होते. वाटेत एका आशियाई फूड्स वाल्या दुकानातून प्रॉन्स, थाय फ्राईड
राईस, आणि असंच कायकाय घेऊन घरी आलो. दुसरा दिवस वर्सायचा किती थकवणारा असणार होता
हे तेव्हा माहीत नव्हतं हे फार बरं होतं.
No comments:
Post a Comment