Monday, March 2, 2015

ऑर्से.. टुइलरीज आणि तूअर-ड-फ्रान्स

सुंदर आखीवरेखीव पॅरीसमधून बसने फिरत फिरत बॅस्टिलला परतलो. तिथे हिप्पोपोटॅमस नावाचं रेस्त्राँ पाहून खूप गंमत वाटली. त्याच गल्लीत पुढे कुठेतरी विक्टर ह्यूगोचं निवासस्थान-स्मारक आहे याची आठवण सुश्रुतला झाली. आपण जाऊच तिथे, ठरवून टाकलं. 
फळं, जेवणाचं साहित्य घेऊन घरी परतलो. डोळ्यांवर तैलरंगांचा लेप बसलेला जणू. आता पुन्हा शिल्पदालने पाहायला जायचंय असं मनाशी घोळवत होते. पण ते जमलंच नाही अखेर.
पुढला दिवस होता रविवार. लूव्रमधे खूपच गर्दी असेल... आज नको परत तिथे जायला असा विचार करून म्यूझे ड ऑर्सेला जायचं ठरवलं. सुश्रुतने सांगितलं आपण टुइलरीज् या लूव्र शेजारच्या बागेत आधी जाऊन चक्कर मारू आणि मगच ऑर्सेला जाऊ. मेट्रोचं टुइलरीज् स्टेशन बागेच्या अगदी लगटूनच होतं. शिरलो. सुरुवातीला एखाद्या जत्रेसारखी लहान मुलांच्या करमणुकीची चक्र, मेरी गो राउंड्स, अनेक खेळण्यांची दुकानं, नेम धरून मारण्याचे वगैरे खेळ मांडलेली दुकानं अशी लांबलचक पट्टी होती. काही उत्साही पालक सकाळीच आपल्या पोरांना घेऊन तिथे आले होते.
तिथल्या जायन्ट व्हीलने खुणावलंच. संध्याकाळी परतताना त्यात बसू असा विचार करून बागेतून फिरतफिरत रस्त्याकडे निघालो. कारंजी, त्याच्या बाजूने उंच चौथऱ्यांवरची दगडी शिल्पे आणि चौकोनी कापलेली मेपल्सची, हॉर्स चेस्टनट्सची झाडे पाहातपाहात पुढे जात होतो. भरपूर खुर्च्या तिथे टाकून ठेवलेल्या. सहज उचलून कुठेही न्याव्यात आणि बसावे अशी सोय होती. बरेच लोक उन्हात तापत पडले होते, कुणी सावलीला वाचत, तर कुणी गिटार वाजवत. काही लोक जॉगिंग करीत होते, धावत होते. एक डू यू नौ इंग्लिशवाले लटिकेऍक्टिविस्ट टोळकेही फिरत होते. ते आमच्या दिशेने येतच होते इतक्यात एक धावण्याचा सराव करणारा ओरडतओरडत पुढे गेला. दीज आर पिकपॉकेट्स. डोन्ट टॉक टू देम. तो बराच पुढे जाईपर्यंत तीच दोन वाक्ये ओरडत लोकांना सावध करीत होता. ते टोळके खाली मान घालून आपण त्यातले नाहीच अशा तऱ्हेने चालत राहिले. गंमत वाटली. खराखुरा भला ऍक्टिविस्ट तो धावणारा तरुणच होता.
रस्त्याच्या दिशेने गेलो तर अनेक पोलीस दिसले. त्यातल्या काहींना आम्हाला, बॉन्ज्हूर करत या बाजूने जाऊ नका रस्ता बंद आहे असं सांगितलं. का विचारलं तर म्हणाले तूअर ड फ्रान्सचा रूट आहे. हे काय त्याची कल्पनाच नव्हती. मग एका पोलिसानेच सांगितलं की तो सायक्लिंगचा इव्हेंट आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जाऊन सेन ओलांडली. आणखी एक प्रेमकुलुपंवाला पूल ओलांडला. पलिकडे गेल्यावर खाली नदीच्या पातळीवर मोठमोठी पोस्टर्स माउंट करून लावलेली दिसली. येताना पाहू म्हणून सरळ ऑर्सेकडे गेलो.
एका जुन्या भव्या रेल्वे स्टेशनचा उपयोग करून ऑर्से हे म्युझियम तयार केलंय. १९०० साली भरलेल्या एका भव्य प्रदर्शनाच्या वेळी हे रेल्वेस्टेशन बांधलं गेलं. कालांतराने ट्रेन्सचे आकार बदलले, तिथले ट्रॅक्स आणि फलाट दोन्ही निरुपयोगी ठरले.  १९७९मध्ये ते बंदच झालं. १९७०मध्ये ते जमीनदोस्त करायचं घाटत होतं म्हणे. पण तोवर ती प्रासादतुल्य इमारत वारसा म्हणून जपावी म्हणून तिचं नाव यादीत आलं. आणि मग ही वास्तू म्युझियममध्ये परिवर्तित झाली. ठरवूनही म्युझियमला इतकी सुंदर वास्तू मिळती ना. त्याचे महिरपी छत, रंगीत काचांच्या चित्रात बसवलेलं भलं मोठं घड्याळ सारंच साजेसं ठरलं म्युझियमसाठी. अतिशय प्रसन्न वास्तू. या वस्तूसंग्रहालयात मुख्यतः एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील पाश्चिमात्य कलावस्तू आहेत. शिल्पे, चित्रे, फर्निचर असं बरंच काही.
मला फार आवडलेला बोर्डेलेचा धनुर्धर, रोदॅंचं नरकाचं दार, ज्याँ बाप्टिस्ट कॉर्पॉसचं युगोलिनोचं शिल्प, विविधरंगी संगमरवर आणि ग्रेनाइटच्या मिश्रणातून वस्त्रांचे पोत साकारलेली शिल्पे, ओले केस मागे सारणाऱ्या युवतीचं संगमरवरी शिल्प... एक संगमरवरी पोलर बेअरचं शिल्प अशी सारी तिथे पाहायला मिळाली. डोक्यात पुन्हा गर्दीच. दुसऱ्या मजल्यावर इंप्रेशनिस्ट चित्रकारांची खास गॅलरी. सगळेच हजेरी लावून होते. मिलेटची उखळात कांडणारी बाई, गॉगेंची चित्रं, स्यूरा, पिसारो... व्हॅन गॉ... उफ्फ...
या म्यूझियममधे एक गोष्ट खूपच खटकली, ती म्हणजे फोटोग्राफीला बंदी होती... तरीही लोक फोटो काढत होतेच आणि स्टाफ मधूनच येऊन उगीच थांबवत होता. फुकटच. एवढ्या मोठ्या लूव्रमधे बंदी नाही, आणि यांचा हा आगाऊपणा कशासाठी होता काही कळलं नाही.
या म्युझियममधे फ्रेंच सुशेगातपणाचाही अगदीच वाईट अनुभव आला. रविवारच्या एवढ्या गर्दीसाठी लंचअवरमधे जी काही रेस्त्राँ होती तिथे दोन सुपरस्लो कर्मचारी होते. अर्धा तास तर रांगेतच गेला. चिडीलाच आलो होतो. भारतात इतका हळूपणा कुणी केला असता तर एव्हाना त्यांचा उद्धार झालाच असता.
चार की पाच तासांनंतर ऑर्से सोडलं. बरंचसं बघून झालं त्यामुळे लूव्रसारखी चुटपूट लागली नाही. ऑर्सेच्या प्रांगणात एका आफ्रिकन बालहत्तीचं छान शिल्प आहे. खंडांची शिल्पेही आहेत. बाहेर पडलो तर रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमलेली. तूअर ड फ्रान्सच्या आगमनाची वाट पाहात थांबले होते लोक. आम्ही पुन्हा सेन ओलांडली. टुइलरीजमधे येऊन खुर्च्यांवर जरासे विसावलो. एक अमेरिकन मुलामुलींचा गट गिटारवर छान गाणी म्हणत बसला होता. सुखावह आवाज होते. मग जायन्टव्हीलच्या हाकेला सुश्रुतने ओ दिली आणि तिकडे गेलो. ते जायन्टव्हीलही सुशेगात होतं. अगदीच हळू चालणारं. वर गेल्यावर भवताल छान दिसेल एवढीच अपेक्षा होती. तो खरंच सुंदर दिसत होता. आयफेल टॉवरच्या दिशेला एक आणि सॅक्रीकूरच्या दिशेने एक असे पावसाचे ढग हलकेच झिरपू लागलेले. एवढ्यात खालू गलका झाला म्हणून पाहिलं, तर तूअर ड फ्रान्सच्या सायकलींची पलटण जोरजोरात हाणत लांबलचक रांगेत सरकताना दिसली. हा तर अगदीच अनपेक्षित बोनस होता. तो फारच मोठा इव्हेन्ट होता हे तेव्हा लक्षात आलं. आणखी एक फेरी घेतली आणि मस्तपैकी स्पर्धेची सेमीफायनल फेरी पाहायला मिळाली. खाली उतरलो आणि बाहेर आलो आणि आम्हीही रस्त्यावरच्या गर्दीत बघत उभे राहिलो. अफाट गर्दी त्यांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्यायला उभी होती. काय उत्साह. आमच्या समोरूनच शेवटची फेरी गेली आणि जेते जाहीर झाले. टुइलरीज मेट्रो स्टेशनकडे जाणारा रस्ता बंद केला होता. म्हणून लूव्रपर्यंत चालत जाऊन तिकडून मेट्रो घ्यायला हवी होती. वाटेत आपापल्या देशांच्या ध्वजांनी चेहरे रंगवलेले, टीशर्ट्स घातलेले तेवढ्यासाठी इतक्या दूरवर आलेले अनेक लोक दिसले. नॉर्वे, हॉलंड सगळीकडून हे प्रेक्षक आलेले.
लूव्रजवळच्या मेट्रो स्टेशनवर अतोनात गर्दी झालेली. पण तरीही सगळं शिस्तीत चाललं होतं. बायांना धक्के मारणारे बुभुक्षितांचे थवे औषधालाही नव्हते. अंग बऱ्यापैकी उघडं टाकलेल्या तरुणी असूनही त्या गर्दीत सगळ्या स्वच्छपणे वावरू, चालू शकत होत्या हे स्वर्गीयच वाटलं.

कॅरीफूरला जाऊन मासे घेतले, माशाचा रस्सा, भात, तळलेले मासे केले. रविवार वाया घालवून कसं चाललं असतं?  जेऊन पायांच्या दुखीला शिव्या घालत झोपलो. उद्या आयफेल टॉवरला जायचं होतं.

No comments:

Post a Comment