Monday, March 2, 2015

फुलांफुलांतून लूव्रकडे

बाहेर येऊन आता कुठे जावं अशा विचारात असताना सायकलरिक्शा दिसल्या. पण एकदम तंत्रसज्ज, वजनाला हलक्या फायबरच्या. एका वेळी दोन किंवा अडीच माणसं बसतील अशा. चालवणाऱ्या तरुणाला विचारलं बाँज्झूsss हौ मच वुड यू चार्ज फॉर लूव्र. तर म्हटला पन्नास युरो. आम्ही धसकून नकारार्थी माना हलवल्या मग म्हटला बरं चाळीस युरो. नकोच म्हटलं. जाऊ चालत. तर आम्ही थोडं पुढे गेल्यावर म्हणाला आय विल तेक यू फॉर तर्ती यूरोस. नकोच म्हटलं. चालत निघालो. नॉत्रदाम चर्च सेनमधल्या एका बेटावर- आयल् द सिटी वर असल्याने सेन ओलांडून लूव्रकडे जायचं होतं. छान हवा होती. मधूनमधून ढग येत असल्यामुळे उन्हाचा त्रास वाटत नव्हता.
आणि मग एक आहाहाहा दुकान लागलं. जार्डिन शॉप. गार्डन शॉप. त्या दुकानाच्या भल्या मोठ्या काचेच्या खिडकीत ऑर्किड्सच्या फुलबहाराची उधळण झालेली. दारात पिण्याच्या पाण्याचं फाउंटन होतं. त्यात बाटल्या भरून घेतल्या. गारेगार पाणी प्यायलो आणि दुकानात शिरलो. तिथल्या खजिन्याचे फोटोही काढलेच. मग छोट्याछोट्या मॅग्नेटिक कुंड्या रेफ्रिजरेटरला चिकटवायला विकत घेतल्या. ऑर्किडसाठी खास असं लिक्विड खत घेतलं. एक छानसा प्रेमळ दिसणारा प्रौढ बिल करून द्यायला पैसे घ्यायला परत आला. मग गप्पाच सुरू. तुम्ही कुठून आलात. मी पण भारतात आलोय एकदा. कॅलकाटाला गेलो होतो. मीच मालक आहे या दुकानाचा. धनंजयला म्हणाला तुझं वय काय. धनंजय म्हणाला मी बराच आहे आता वयाने.- किती?- एकसष्ट. मग तुला मला मान द्यावाच लागेल बाबा म्हणे. मी सदुसष्ट वर्षाचा आहे. खरंच वाटत नव्हता. तसं सर्वांनी म्हणून दाखवल्यावर स्वारी खूष. मर्सी बिर्सी म्हणून निघालो.
पुढे रांगेने झाडं, फुलं, कुंड्या वगैरे बागकामाचं साहित्य विकणारी दुकानं होती. ती पाहातपाहात जाताना सेन ओलांडणाऱ्या कालच्याच पुलापाशी येऊन पोहोचलो. पलिकडे गेलो. आता भूक खवळलेली. पण मुख्य रस्त्यावरची सगळी रेस्त्राँ भरगच्च भरलेली. थोडं पुढे जाऊन एका शांतशा गल्लीतल्या रेस्राँत शिरलो. फूटपाथवर घातलेल्या टेबल खुर्च्यांवर बसलो. वाडगाभर सलाड नि चिकन, ब्रेड वगैरे खाल्लं. दुसऱ्या दिवसापासून घरून सॅण्डविचेस करून घ्यायची असं ठरलं. ती वन वे वाली गल्ली होती. त्यामुळे बऱ्याच गाड्या येऊन रस्ता न सापडून गोलगोल चकरा घालताना दिसत होत्या. पण कुणीही कुणी बघत नाहीसं पाहून राँग साईडने गाडी पळवली नाही. आय़ला, वेडेच आहेत.
जेवून झाल्यावर लूव्रच्या दिशेने निघालो. वाटेत एक अँटिक फर्निचर शॉप, एक पेट शॉप जरा नीट पाहून घेत थोडा वेळ घालवला. मग लूव्रच्या मागच्या बाजूच्या दरवाजातून आत शिरलो. अबाबाबा... केवढा मोठा प्रासाद आहे हा. या संपूर्ण वास्तूत काय अर्ध्या वास्तूत म्यूझियम पसरलेलं असेल तरीही कधीच पूर्ण पाहून होणार नाही हे कळलंच. दोन महिने केवळ हे पाहाण्यासाठी पॅरीसमुक्काम आवडेल पण परवडायचा नाही...
मधल्या प्रांगणात एक छानदार कारंजं होतं आणि चहूबाजूंनी अंगावर येणारा तो अतिशय अलंकृत असा प्रासाद. किती पुतळे, कितीकिती पुतळे त्या प्रासादाच्या दर्शनी भागावर कोरलेले असतील त्याला काही सीमाच नव्हती. तेराव्या शतकापासून बांधायला घेतलेला तो प्रासाद सोळाव्या शतकापर्यंत बांधला जात होता. राजघराण्यातील अनेक विलासी वस्तू, कलाकृती यांचा संग्रह इथे ठेवायचं ठरलं आणि मग फ्रेंच राज्यक्रांतीनंतर त्याचं वस्तूसंग्रहालयच झालं.
जगभरातलं अव्वल दर्जाचं, सर्वात प्रचंड असं हे लूव्र पाहायचं हे स्वप्नच होतं माझं, केव्हापासूनच. पण त्याची अफाट आकार बाहेरूनच पाहून हम ने हार मान ली. डॅन ब्राऊनच्या दा विन्ची कोडमधून परिचयाचा झालेला परिसर सम्मोर होता साक्षात. तो चौक ओलांडून बाहेर मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो. समोर ते काचेचं पिरॅमिड. उलटं चॅलिस. सभोवार कारंजी, तळी, बाग... तिथं खिळून पाहात उभे असतानाच कानावर शब्द आले- डू यू स्पीक इंग्लिश. या प्रश्नावर लेकीने आधीच सावध करून ठेवलेलं. पॅरीसमधल्या सर्व पर्यटनस्थळांवर तथाकथित समाजकार्यकर्त्यांचे गट फिरत असतात. ते सुरुवातच अशी करतात- डू यू स्पीक इंग्लिश? होकारार्थी उत्तर आलं की हे पर्यटक हे त्यांना निश्चित समजतं. मग एक कागद पुढे करून कुठल्यातरी सामाजिक कार्यासाठी पैसे मागतात. तोवर आसपास घिरट्या घालणारे त्यांचे साथीदार खिसा साफ करतात, कॅमेरे पळवतात, लॅपटॉप, मोबाइल्स जे हाती लागेल ते. ते चांगलं लक्षात होतं. मग धनंजयने त्या गधड्याला उत्तर दिलं- त्याच्या खास आवाजात- नो- आय स्पीक मराठी. ते सटपटलं. बाजूला झालं. आणि मग आम्ही पाठ फिरवून पुढे जाताच शिव्या घालू लागलं. मग मी मागे वळून त्याला अस्सल इंग्रजीतली वंगाळ वंगाळ शिवी हासडली. तसं ते लुप्त झालं.
आयफेल टॉवरच्या लहानमोठ्या प्रतिकृती विकणारेही त्या प्रांगणात फिरत होते. काळे किंवा तपकिरी कातडीचेच होते सगळे. गंमत वाटली. म्यूझियम पास हाती असल्यामुळे छोट्या रांगेतून पटकन् पिरॅमिडखालच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. सुश्रुत आणि मी एकाच वेळी ठरवलं पेन्टिंग्जची गॅलरी पाहायची. धनंजय पूर्वीही येऊन गेला होता. पण तसा घाईतच. पण निवड आमची होती. निघालो. समोर पंखवाल्या व्हीनसबाईंचा उंचच उंच पुतळा आणि मग तैलचित्रांच्या अनेक दीर्घीका... डोळे गरगर फिरायचेच बाकी होते. काय पाहाणार किती साठवणार. या म्यूजियममधल्या ३५ हजार वस्तूंपैकी ७५०० तर केवळ ही तैलचित्र आहेत. वेड तर लागलंच. पेन्टिंग्ज इन लूव्र असं टाकून इमेजेस पाहिल्यात तर बरीचशी पेन्टिंग्ज पाहायला मिळतील नेटवर. ती झलक पाहून कळेल मी काय म्हणतेय ते. खूप सुंदरसुंदर विभ्रम पाहिले रंगांचे. सगळे मोठे चित्रकार आणि त्यांच्या कलाकृती...
अपेक्षेनुसार मोनालिसाच्या चित्रासमोर भाऊगर्दी आणि क्लिक्लिकणारे मोबाईल घेतलेली दिखाऊ घाऊकगर्दी खूप होती. फारसं जवळ न जाता बाकीची चित्र पाहून घेतली. मोनालिसाने तसेही कधीच फारसे मोहवले नव्हते. त्या विभागातली इतर चित्रे अधिक भावली. काय आकर्षण आहे तिचं पाहूनही नाही कळलं. मी एकतर अडाणी असणार किंवा मग- माहीत नाही.

किती वेळ फिरलो... आठवत नाही. आता एकही पाऊल टाकवणार नाही अशी स्थिती झाल्यावर मिळेल त्या जिन्याने खाली उतरलो. बाहेर येऊन प्रवेशद्वाराची कमान पाहिली आणि मग ल ओपन बस दिसताच त्या दिशेने सुटलो. या वेळी ती बस लूव्रमधून निघून कॉन्कॉर्डमार्गे सेनच्या या काठावरून आयफेल टॉवरच्या समोर सेनच्या या तटावर असलेल्या इमारतीसमोरील सुंदर कारंजाजवळून मग आर्क डी ट्रायम्फच्या कमानीजवळून गेली. तिथला पॅरीसमधला सर्वात श्रीमंती शॉपिंगचा सुंदर भाग म्हणजे शॉन्ज्एलिझे (म्हणजे आपण सरळ मराठीत वाचताना चॅम्प्स एलिसे वाचलं असतं) वरून फिरतफिरत बस गेली. आमच्या तुटपुंज्या दिवसांत आणि तुटपुंज्या स्नायूशक्तीत तिथून फिरणं राहून गेलं. तिथून फिरताना प्रसिध्द गाण हेsss शॉन्जेलिझे हे गाणं इयरफोनमधून मधूनमधून वाजत होतं. आणि मधूनमधून माहिती. आर्क ड ट्रायम्फचं राजस व्यक्तिमत्व दुरून पाहून पुरलं. आय़फेल टॉवरला वळसा घालताना त्याच्या पहिल्या मजल्यावर रंगवलेली नावं लक्षात आली. गुस्ताव आय़फेलने या पहिल्या मजल्यावर तोपर्यंत होऊन गेलेल्या साऱ्या वैज्ञानिकांची नावे तिथे लिहवून घेऊन सलाम मारलाय. ते पाहून ऊर भरून येतो. ऐतिहासिक राजकीय व्यक्तिमत्वांच्या स्मारकांच्या पुढे न जाणारी आपली सामाजिक अक्कल किती तोटकी आहे याची विषण्ण जाणीव झाली.

No comments:

Post a Comment