मंगळवारी लवकरच परिसर उठायच्या आधीच ताडताड बॅस्टिल
मेट्रो स्टेशनला चालते झालो. आज गेल्या चार दिवसांचा रूट न घेता एम् ५ घेऊन जायचं
होतं. आणि मग तिथून पुन्हा दुसरीच ट्रेन पकडून वर्सायला जायचं होतं.
पावसाची चिन्हं होती. थंडी पडलेली. वर्साय
स्टेशनला पोहोचलो. समोरच मॅकडॉनाल्डचं आटलेट होतं. तिथे केवळ रेस्टरुम
वापरण्याच्या उदात्त हेतूनेच गेलो. सुशेगात फ्रान्सचा आणखी एक अनुभव. एक सुंदरी
टॉयलेट साफ करत होती. ती कुणालाही आत येऊ देईना. दहा मिनिटं झाली, पंधरा मिनिटं
झाली. हिची सफाई चालूच. मागे रांग वाढत गेली. शेवटी एक माणूस संतापला. आणि दार
ढकलून आपल्या आठ वर्षांच्या पोराला घेऊन आत शिरला. त्या बिचाऱ्या पोराला घाई
लागलेली. आणि सुंदरी हाथापाईवर आली. तो विनवणीच्या सुरात बोलत असूनही ही फ्वाँ
ख्वाँ करत ओरडू लागली. तसे सगळेच आत शिरले आणि तिच्यावर ओरडू लागले. त्यात काही फ्रेंच
सूरही तितक्याच जोरात फ्वाँख्वाँ राँराँ करू लागले. आत गेलेल्या लोकांचे दरवाजे ती
धडधडवत होती. कोणी तरी तिला सॉल्लिड दम भरला तशी ती फाँफँ करत बाहेर पडली. खरं
म्हणजे सगळं स्वच्छ होतं.
काहीतरी न्याहारी करून बाहेर आलो तेव्हा लक्षात
आलं, इथल्या रस्त्यांच्या खडीत लालसर, गुलाबी रंगाच्या खडीची मिसळण होती. सारा
रस्ता गुलबट राखी रंगाचा. खूपच छान वाटला.
वर्साय प्रासादाच्या दिशेने निघालो. १६२३ साली
तेराव्या लुईने आपल्या शिकारीच्या मोहिमांसाठी पॅरीसपासून वीस किलोमीटरवरच्या
वर्साय या आइल-द-फ्रान्सच्या भागात एक छोटासा प्रासाद बांधला. त्यानंतर जवळपास
पन्नास वर्षांनंतर हा छोटा प्रासाद मधोमध ठेवून, मग तो बदलून, एका प्रचंड मोठ्या
प्रासादाने वेढून घेतला गेला. वर्सायचा प्रासाद म्हणजे राजेशाहीचे विलासी प्रतीक
ठरले. सोळावा लुई आणि मारी आन्त्वानेत यांच्या विलासी रहाणीचे आणि फ्रेंच
राज्यक्रांतीच्या उद्रेकाचे चिरंजीव प्रतीक ठरले. राज्यक्रांतीचे पडघम वाजू लागले
तेव्हा सोळाव्या लुईने आपला मुक्काम पॅरीच्या टुइलरीच्या प्रासादात हलवला म्हणे
आणि त्याला वर्सायमधलं फर्निचर तिथे हलवायची इच्छा झाली. पण वर्सायच्या नागरिकांनी
त्याला विकोध केला. पण त्यानंतर साताठ महिन्यांतच क्रांतीच्या हिंसक टप्प्यात
वर्सायच्या आणि लुईच्या दुर्दैवाचे फेरे सुरू झाले. या प्रासादातील वस्तूंची
लुटालूट सुरू झाली तेव्हा वर्सायच्या रहिवाशांनी पुन्हा ती लुटालूट काही अंशी
रोखून धरली. हा प्रासाद आहे तसा रहावा, लोकांना पाहाण्यासाठी खुला व्हावा ही
मांडणी यथावकाश झाली. काही वस्तू लिलांवात काढल्या गेल्या, पडदेबिडदे गेलेच. पण
काही कलात्मक वस्तू विकल्या जाऊ नयेत असे ठरले. १७९३मध्ये हा प्रासाद एक
वस्तूसंग्रहालयासारखा जतन करण्याचे ठरले आणि अनेक चर्चेस, राजघराण्यातील लोकांची
खाजगी घरे यातून जप्त केलेल्या मौल्यवान वस्तूही येथे आल्या. आज या प्रासादात अशा
अनेकानेक वस्तू आहेत. अंगावर येईल इतकी संपत्ती, सोनेरी मुलामा, कोरीव काम, उंची
चिनीमातीच्या वस्तू, संगमरवरी वस्तू, शिसवी, एबनीचे कोरीव फर्निचर, मोठमोठे पलंग
आणि हजारोंनी तैलचित्रे... हॉल ऑफ मिरर्समधली चित्रे, मेणबत्त्यांची झुंबरे...
लुईच्या घराण्यातील सर्व सदस्यांची तैलचित्रे.
केवढा हा विलास! आणि मग सोळाव्या लुईचे सुदैव संपून
दुर्दैवविलास!
बाहेरच्या कुंपणभिंतीचे महाद्वार ओलांडून आत
गेल्यावर जुन्या दगडी लाद्यांनी मढवलेले विस्तीर्ण प्रांगण आहे. इतक्या लवकर
येऊनही वेटोळी घालत प्रांगणभर फिरलेली रांग पाहून आम्ही दडपलोच. एका चौकशीच्या
चौकीत बसलेल्या एका मुलीने बॉन्ज्झूsss नंतर सांगितले, की तिकडे उजवीकडे ऑफिस दिसतंय
तिथे गेलात तर तुम्हाला गाइडेड टूर मिळेल. हे एवढं प्रचंड पाहायचं तर गाईड घेणंच
श्रेयस्कर. पण तिने हेही सांगितलं, ही रांग पुढे सरकायला दोन तास लागेल, आणि
तुम्हाला टूरही लगेच नाही मिळायची... पण करा प्रयत्न. गेलो. खरोखरच पुढची टूर दोन
तासांनंतर होती. म्हणजे बारा वाजता. पण आम्हाला तिथल्या माणसाने सांगितलं, की तोवर
तुम्ही बागेत फिरून येऊ शकता. पण इथे वेळेवरच यायचं. एकदा ग्रुप निघून गेला की मग
त्यांना शोधता येणार नाही.
१५ युरो प्रत्येकी मोजून तिकिटं घेऊन निघालो.
बागेतला प्रवेश फुकट होता. आत शिरलो. एकाच नजरेत कळलं की ही बाग बघणं एका अख्ख्या
दिवसाचं काम आहे. शिवाय मारी आन्त्वानेतचा प्रासादही बागेतच आहे. तिथे बागेतून
फिरवून आणणाऱ्या, मारीच्या त्रिऑनॉन नावाच्या प्रासादापर्यंत- आता ते पंचतारांकित
होटेल झालंय- नेऊन आणणाऱ्या गाड्या होत्या. रांगेत उभे राहिलो, पुन्हा एकदा
सुशेगात फ्रेंच अनुभव. तिकिटं द्यायला इतका वेळ लावत होते की वीसपंचवीस मिनिटं
आम्ही रांगेतच उभे होतो. तरीही रांग हलेना. वेळापत्रक सांभाळायचं म्हणून रिकाम्या
गाड्या सोडत होते पण झटपट तिकिटं देण्यासाठी कुणी रांगेत फिरावं किंवा आणखी एक बूथ
उघडावा असं काही त्यांना सुचलं नाही. अंदाज घेतला. आणखी वीस मिनिटं इथे
काढण्यापेक्षा चालत जावं...
या राजवाड्याचा विस्तार सुरू झाला तेव्हा दुसऱ्या
टप्प्यात त्याला प्लेझर्स ऑफ द एन्चान्टेड आयलँड असं नाव दिलं गेलं होतं. मंतरलेल्या
बेटावरले हर्षोल्लास... या बागेचा आवाका एवढा प्रचंड आहे. नाव शोभतंच. पण बुडाखाली
गाडीघोडे असतील तरच मंतरलेलं वाटेल. नाहीतर चालूनचालून तंतरण्याचीच पाळी. मधल्या
तळ्यापर्यंत चालत गेलो. तो दिवस संगीत-उद्यानाचा असल्यामुळे सर्वत्र मंद्र सप्तकातलं
वाद्यसंगीत वाजत होतं. त्याचा उगम कळतही नव्हता. त्या शांत रम्य
बागेचे भाग पाडलेले, उंचउंच हिरव्या झाडीच्या, कुंपणी झुडुपांच्या भिंती पलिकडलं
बघूही देत नव्हत्या.
त्या लांबलचक बांधीव जलाशयात कयाक्स फिरवायची सोय
होती. वेळ घेऊनच आलं पाहिजे तरच जमेल. जलाशयातलं नेपच्यूनचं शिल्प पंधराव्या लुईने
करवून घेतलेलं. खूप मनाची पकड घेईल असं काहीच नाही. विलासी बागेला शोभेल इतकं
सुंदर
वर्सायचा तो अगडबंब प्रासाद गाईडच्या बरोबर
पाहाणं फारच चांगलं ठरलं. ती इतिहासाची विद्यार्थिनी असलेली बाई होती. आणि
वर्सायबद्दलचा अभिमान खूपच. अमेरिकनांनी मारी आन्त्वानेत फार सुंदर होती असं चित्र
रंगवलंय ते चूक आहे हा तिचा पहिल्या पाच मिनिटांतला ठासून सांगितलेला मुद्दा
गमतीशीर वाटला. अडीच शतकापूर्वी होऊन गेलेली राणी सुंदर होती की बेतासबात होती
कुणाला फरक पडतो. पण तिने फार छान माहिती सांगितली. लुई आणि मारीची शयनगृह,
लायब्ररी, भोजनकक्ष आणि तिथल्या वस्तू, तैलचित्रांचे तपशील, फर्निचरचे तपशील सारं
नीट रमून रंगून सांगत होती ती. गाईड लोकांच्या बोलण्यात जो एक रटाळ उत्साह असतो तो
तिच्या स्वरात, शैलीत नावालाही नव्हता. लुईचे चॅपेल गाईडेड टूरचे जास्तीचे पैसे
भरल्यामुळे आम्हाला आतून पाहायला मिळाले. जिथे सोळावा लुई आणि मारीचे लग्न लागले,
जिथे राजाचे कुटुंबिय रोज माससाठी येत वगैरे... भव्य छत, वर रंगवलेली चित्रे,
सोनेरी मुलाम्याचे प्रचंड काम... वगैरे. साधं तिकिट काढलेले लोक हावऱ्या नजरेने आत
पाहायचा प्रयत्न करीत होते. स्वातंत्र्य समता बंधुताचा नारा ज्या ठिकाणी दिला गेला
आणि रणकंदन झाले तिथे तिकिटाने साधलेली ही असमानता पेशलच वाटली.
रॉय आणि रीन ची म्हणजे राजाराणीची शयनगृहे, दालने
यांच्याबरोबरच वेगवेगळ्या खोल्या व्हीनस, डायना, मार्स, मर्क्युरी, अपोलो वगैरे
नावाने सजवलेल्या. त्यातही राजघराण्याचा वावर असल्यामुळे भरमसाठी कोरीव काम
केलेल्या वस्तू तिथे होत्याच.
सर्वात आवडली ती क्लॉक रूम. पंधराव्या लुईला
भूगोल, नकाशे, तंत्रज्ञान याची खूप आवड होती. त्याच्या मित्रमंडळींत अशा
तंत्रज्ञांचा, शास्त्रज्ञांचाच भरणा असे. त्याने अनेक घड्याळे तयार करवून घेतली.
एक प्रचंड मोठे अस्ट्रॉनॉमीकल घड्याळ म्हणजे पंधराव्या लुईचे वर्सायमधले मोठे
योगदान. क्लॉड पासेमाँ आणि लुई डाथॉ या तंत्रज्ञ आणि घड्याळजी अशा जोडीने केलेले
हे कोपर्निकसने दिलेले ग्रहगती, चंद्रकला आणि वेळ, तारीख वगैरे दाखवते. अर्थात
त्यातही कोरीव धातूची सजावट आहेच. पृथ्वीची जाण देणारी चित्रे त्यावर रंगवली आहेत.
हाताने चावी देण्याचे हे घड्याळ आता अडीचशे वर्षांचे जुने झाले तरीही न कुरकुरता
टिकटिकत आहे. वर्षगणनेचा काटा दोनशेपस्तीवर्ष पहिल्या एक आकड्यावर स्थिरावलेला. तो
नवे सहस्रक सुरू होताना सहजपणे दोनवर जाऊन स्थिरावले हे विशेष. हे घड्याळ येती
दहाहजार वर्ष चालत राहील म्हणे.
याच बरोबर साधारण वीसपंचवीस वेगवेगळी मोठमोठी घड्याळे,
आणि अनेक टेबल्सवर रेखलेले फ्रान्स,
युरोपचे नकाशेही आहेत.
वेगळा रॉय होता हा...
हॉल ऑफ मिरर्समधली चित्रे, झुंबरं, पुतळे, टेबल्स,
मोठमोठे रांजण सारा माहौल म्हणजे एका विलासात चूर असलेल्या इतिहासाचा एक धबाडा घास
आपण चावतोय असं काहीसं वाटत राहिलं. त्या राजकुलाबद्दल आपल्याला काहीच आस्था नसते
हेही कारण असेल कदाचित्.
पण एक जाणवले, भारतीय संस्थानिक राजकुँवर पॅरीसला
जाऊन भरपूर उधळपट्टी नि विलास करून येत अशत हे तर प्रसिध्दच आहे. हा लूव्र,
टुइलरीज, शायलॉ, आणि वर्सायसारखे राजप्रासाद पाहून बिचारे आपल्या राजेपणाला त्या
प्रासादांच्या लघुप्रतिमा चिकटवायची धडपड करीत असणार. हे राजवाडे पाहिल्यानंतर
भारतीय संस्थानिकांच्या जुन्या राजवाड्यांचा नक्कल धडपडीचा संदर्भ लागतो. बडोदा,
काश्मीर आणि आणखी काही प्रासाद सोडले तर बाकीच्या केविलवाण्या नकलाच.
वर्साय एका दिवसात पाहाणं हे लूव्रइतकंच अवघड काम
आहे. पण राहून गेलं तरी फार काही चुकलं असं वाटत नाही.
दोन गाड्या बदलून जायचं होतं. मंगळवारी बाकी
पॅरीसमधली सगळी म्यूझियम्स बंद असल्यामुळे सगळी गर्दी वर्सायला ओतली होती. वर्साय
स्टेशनवर सुशेगात फ्रेंचांचा तिसरा अनुभव आला. फलाटाला लागलेल्या एका गाडीत जाऊन
बसलो. थोड्याच वेळात संपूर्ण गाडी भरली. शेजारी आणखी एक गाडी येऊन लागली. ही
भरलेली असल्यामुळे नंतर आलेले लोक त्यात जाऊन बसले. आणि काहीही घोषणा न होता तीच
गाडी भुस्सकन सुटली. इथले सगळे भिडू हवालदिल. मग आणखी एक गाडी येऊन शेजारी लागली.
थोड्या वेळात ती हास्स्स हुस्स्स आवाज करू लागली. तरीही घोषणा नाहीच बऱ्याच
लोकांनी आपली गाडी सोडली आणि तिच्यात जाऊन बसले. आमची गाडी अजिबातच हास्स्स
हुस्स्स करीत नव्हती म्हणून आम्ही पण त्या सुस्कारत्या गाडीत जाऊन बसलो. घोषणा
नाही. आता ही सुटणार की आपण सोडून दिलेली ती पहिलीच सुटणार... सर्वच लोक आपसात हसत
चर्चा करीत होते. शेवटी ही नवी गाडीच सुटली तेव्हा लोकांनी टाळ्या वाजवल्या.
व्हीटीच्या घोषणा आठवल्या प्लॅटफॉर्म नंबर दो की गाडी रद्द कर दी गई है... किंवा
प्लॅटफॉर्म नंबर आठ की गाडी यार्ड में जाएगी... इथे सुनसान सुमडीच.
इनव्हॅलिडेस स्टेशनवर पोहोचलो तर तिथे इतकी अलोट
गर्दी झालेली... फ्रेंचांनी गर्दी आवरण्याची आपल्यासारखी थोडीच सवय असायला... घाम
फुटलेला कर्मचाऱ्यांना. त्यांनी तिकिट आत सरकवून बाहेर पडण्याचे स्वयंचलित दरवाजे
पूर्णपणे उघडून टाकले. गो गो गो... असं दोन बाजूंनी ओरडत उभे होते दोघे. तिकिटं
मशीनमधून व्हॅलिडेशन न होताच आम्ही पुढे गेलो. दुसऱ्या मेट्रोत बसून बॅस्टिलला
उतरलो. तिथे कर्तव्यदक्ष फ्रेंचांचा अनुभव आला. त्यांनी तिकिट पाहायला मागितलं. ते
दाखवल्यावर फाँफाँ करीत म्हणाले हे व्हॅलिड नाही. मग त्यातल्या एकाकडे आम्हाला
सोपवलं. त्याला सगळं वर्साय, गर्दी, दरवाजे उघडले गेले वगैरे समजावून सांगितलं.
म्हटला बरं थांबा ते चेक करतो. मग त्याने त्या स्टेशनवर फोन लावून खरंच असं झालं
होतं का विचारून घेतलं. मग सॉरी वगैरे म्हणून जाऊ दिलं. च्या मारी. धनंजयने हलकेच
भकार वापरून घेतला. आणि पुन्हा मुक्कामी परतलो.
No comments:
Post a Comment