Monday, March 2, 2015

रिज्क्स म्यूझियम- डचपणाचा गौरव

सकाळी समोर जाऊन बस पकडली आणि निघालो. काल येतानाच डोळ्यात भरलेला समुद्राखालून काढलेला भुयारी मार्गच घ्यायचा होता. स्टेशनजवळच्या परिसरात पोहोचल्यावर तिथे ट्राम आणि बसेस यांची शिस्तीत येजा होती. आणि फ्रिक्वेन्सी तर उत्तमच. या ट्रामचं आणि बसचं तिकिट एकत्रच काढायची सोय होती. त्यावरच्या इलेक्ट्रॉनिक पट्टीला मशीनजवळ नेलं की तुमच्या तिकिटवापराची नोंद होते.
स्टेशनच्या समोरच टूरिस्ट ऑफिस आहे हे वाचलं होतं. तिथे एका खाजगी कंपनीचंही ऑफिस होतं. सुश्रुतने आधी चुकून तिथेच चौकशी केली. प्रथम नकाशाबद्दल विचारलं. नकाशा साधारणतः फुकट वाटला जातो. पण तिथल्या बाईने तो एक युरोला सांगितला. आणि म्हणाली पलिकडे शासकीय ऑफिसमधे तो तीन युरोला मिळेल. पण सुश्रुतला शंका आली. बसट्रामचा पास कुठे मिळेल हे विचारल्यावर तिथली बया त्यांच्या टूरची माहिती देऊ लागली. आम्ही तिथून निघालो आणि शेजारच्या शासकीय ऑफिसमधे गेलो. म्युझियमपास आणि तिकिटं विकत घेताना नकाशा विचारला तर त्यांनी तो फुकट देऊन टाकला. त्यांना शेजारच्या ऑफिसबद्दल सांगितलं, तर तिथली मुलगी हसली फक्त.
मग ट्राममधे बसून रिज्क्सम्युझियमकडे निघालो. वाटेत दिसणारं ऍमस्टरडॅम भारी देखणं होतं. एक गंमत लक्षात आली, मूळ पक्क्या दर्यावर्दी लोकांचं हे गाव... जहाजं, समुद्रातलं जीवन म्हणजे यांचा जीवच. तिथल्या अनेक इमारतींवर वातकुक्कुटाऐवजी जहाजं बसवलेली. वातजहाज. इथल्या एकमेकांना लगटून बांधलेल्या इमारतींमागे कारण आहे. एकेक भिंत कॉमन असल्यासारख्या इमारती असतात. त्यामुळे थंडीत इन्सुलेशनचा, हीटिंगचा खर्च कमी येतो.
इथले लोकही पॅरीसमधल्या लोकांपेक्षा अधिक मनमोकळे, हसरे आहेत हे लगेच लक्षात येतं. रिज्क्सम्युझियमकडे जाताना वाटेत सारं कालव्यांचं जाळं पार करतकरतच जात होतो. किती देखणेपणा होता त्या कालव्यांत. इतकी मनःपूर्वक राखण. कारंजी, बागा, दुकानं सारंच सुंदर. पण तरीही त्यात पॅरीशियन औपचारिक रेखीवपणा नव्हताच इतकी मोकळी रचना. सारं सहज घडून, जुळून आल्यासारखं.
म्युझियम स्क्वेअरमधे पोहोचलो. तिथून जवळच व्हॅन गॉ म्युझियमही आहे. आणि तिथवर कालव्यातूनही जाता येतं. छोट्याछोट्या देखण्या वास्तूंनी सजलेल्या रस्त्यावरून पुढे सरकतो आणि धाडकन् ही भव्य वास्तू आडवी येते. रिज्क्सम्युझियम. अठराव्या शतकाच्या अखेरील आपल्याकडेही लूव्रसारखं म्युझियम असायला हवं अशी कल्पना पुढे आणली गेली. आणि या म्युझियमची घडण सुरू झाली. प्रथम हॅग या शहरात आणि मग इथे ऍमस्टरडॅममधे हे म्युझियम आलं. आणि मग बरीच स्थित्यंतर होत एका वास्तूशिल्प स्पर्धेत डिझाइन तयार होऊन १८८५मधे या आताच्या वास्तूत हे रिज्क्सम्युझियम आलं.
या इमारतीवर ढळढळीत लिहून ठेवलंय, कला हा एक मानसोपचार आहे... ART IS THERAPY.
थकलेल्या, हरलेल्या मनाच्या असंख्य कोपऱ्याकंगोऱ्यांना भिडणारं आणि त्यांची शुश्रुषा करणारं काही ना काही वस्तूसंग्रहालयांतून सापडतं आणि म्हणूनही आपण तिथं ओढावून जात असतो हे हलकेच लक्षात आलं ती ठळक अक्षरं वाचून.
प्रवेशद्वारातच एक कागद लावून ठेवलाय. डच भाषेत आणि इंग्रजीत लिहिलेला. त्याचा अनुवाद असा-
कला हा एक मानसोपचार आहे
म्युझियमची फेरी साधारणतः आपल्याला कलेशी ओळख करून घेण्याची संधी असते. या फेरीचा हेतू थोडा वेगळा आहे. यात भेटणाऱ्या कलेमुळे तुमचं जीवन थोडं अधिक व्यथामुक्त व्हावं असा हेतू आहे. कला ही मानसोपचारासारखी कामी यावी असा हेतू आहे. या भेटीतील प्रमुख भूमिका कला बजावणार नसून ती तुम्ही बजावायची आहे: तुमच्या आशा, तुमच्या निराशा, तुमची दुःखे, तुमची असोशी- या सर्वांबद्दल कलेतून काही टोकदार आणि अनेकदा उपयुक्त भाष्य होते.
मग नकळत आपण आपल्या मनातल्या आशा-निराशा-दुःख-अपेक्षांशी तिथल्या चित्रशिल्पांचा मेळ घालून पाहातो. काही वेळानंतर ते विसरूनही जातो. आणि निर्मळपणे सारे पाहून लागतो. इतिहासात घडवल्या गेलेल्या कलानिर्मितींचे संदर्भ आणि परिणाम तपासू लागतो.
डच लोकांच्या डचपणाला सलामी म्हणून हे म्युझियम बांधलं गेल्याचं सांगतात. दोनेक लक्ष कलावस्तूंचा संग्रह आहे इथे. अर्थात एका वेळी आठ हजार वस्तूच मांडलेल्या असतात.
आत शिरताच डच आपुलकीचा अनुभव येऊ लागला. तिथला प्रत्येक कर्मचारी नीट मनापासून माहिती देत होता. ऑडियो एड्स घ्यायला गेलो तिथे काउंटरवरच्या तरुणाने इतकं छान समजावून सांगितलं. मग आम्ही जरा थकलेलो आहेत असं जाणवताच त्याने स्वतःहून सांगितलं, इकडून जा, लिफ्ट घ्या आणि वरच्या मजल्यावर जा, आणि तिथून खाली उतरत पाहात या. कसला गोड मुलगा होता तो. निघालो तर पुन्हा लक्ष वेधवून सांगितलं, तुमच्या या इन्स्ट्रुमेंटची बॅटरी कदाचित संपेल हं. इथेच येऊन बदलून घेऊ शकता. मीच असेन असं नाही. पण माझा कोणताही सहकारी तुम्हाला मदत करील. एन्जॉय...
या म्युझियमचा लेआऊट खूपच सोयीचा आहे. प्रशस्तही. सुंदरही. इथे अनेक ठिकाणी म्युझियमच्या क्युरेटरने काही मतं लिहून ठेवलीत. त्यात काय असतं- काय असावं आणि दुष्टमत काय अशेल अशा प्रकारची मल्लिनाथी आहे. काही कमेन्ट्स छान होत्या. काही क्लिशे. काही बोगस. पण साधे प्रिंटआउट्स होते ते चिकटवून ठेवलेले. सतत बदलत असणार असे. मजा वाटली.
वेर्मीर, रेम्ब्राँ, व्हॅन डाईक, जॉन स्टीन, हॅल्स अशा अनेक चित्रकारांची तैलचित्रे या म्युझियमच्या २००० चित्रांच्या संग्रहात आहेत. यातील वेर्मीरची मिल्कमेड आणि रेम्ब्राँचे नाईट वॉच नावाचे तैलचित्र ही मनात रहातील अशी. एकाग्रचित्त होऊन प्याल्यात दूध ओतणाऱ्या शिल्पवत् स्त्रीच्या हातातील भांड्यांतून खाली पडणारी दुधाची धार जणू हलतेय की काय असा भास व्हावा असे चित्रण. अनेक शिल्पकृती, फर्निचर, हजारो जहाजांच्या हुबेहूब, प्रतिकृती, डचांनी बोर्निओ, सुरीनाम वगैरे ठिकाणी वसाहती केल्या होत्या तिथल्या शस्त्रांचे संग्रह, तिथल्या लोकांचे पेहराव, बोर्निओच्या सुलतानाच्या गळ्यात असलेला ७० कॅरटचा बांजारमासिन नावाचा हिरा, जगभरातून जमा केलेल्या अनेक कलावस्तू, एक अतिशय सुंदर बाहुल्यांचे घर... पण हे सारे पाहाताना लूव्रला होते तशी असाहाय्य अवस्था होत नाही. मन एकेका पापुद्र्याने फुलत प्रसन्न होत जावे अशीच काहीशी रचना आहे या म्युझियमची.

या म्युझियममधे टॉयलेट्सची संख्या प्रचंड आहे. एकाच ठिकाणी पण एका लांबलचक रांगेत जवळपास पन्नास टॉयलेट्स होती. स्त्रियांची पन्नास, पुरुषांची पन्नास. म्युझियम पाहायला आलेल्या लोकांचा वेळ नसत्या गोष्टीत रांगा लावण्यात जाऊ नये म्हणून ही काळजी घेतलेली. त्यांचा कॅफेटेरियाही लोकांचा वेळ अजिबात फुकट जाणार नाही अशा कार्यक्षमतेने आणि कौशल्याने चालवला जातो. इतकी चटपटीत सेवा देणारे आणि लागलेली रांग भराभर बसवली जाईल याची काळजी घेणारे ते कर्मचारी पाहून निदान पॅरीसच्या ऑर्से म्युझियमच्या लोकांनी इथे प्रशिक्षणच घ्यायला पाहिजे असं वाटलं. 

No comments:

Post a Comment