उद्या अमृता येणार होती. आणि आमचा परिवार पुन्हा एकदा काही दिवस एकत्र रहाणार होता. अचानक अमस्टरडॅम खूपखूप प्रिय वाटून गेलं...
अमृता घेंटहून ट्रेनने येणार होती. त्यामुळे तिला
घ्यायला स्टेशनला गेलो. तिला ट्रामच्या पाच नंबरच्या स्टॉपवर थांबायला सांगितलेलं.
हा ऑगस्ट महिन्यातला पहिला शनिवार. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या शनिवारी
अमस्टरडॅमच्या सुप्रसिध्द कॅनाल्समधे गे परेड असते हे वाचलं होतं. साऱ्या शहरभर
एलजीबीटीक्यूचे रंगीत ध्वज फडकले होते. अनेक इमारतींच्या घरांतून त्यांचे रंग
झळकवणाऱ्या फिती सोडल्या होत्या. स्टेशनजवळ ही रंगीबेरंगी गर्दी होती.
इंद्रधनुष्ये अवतरलेली. बऱ्याच लोकांच्या अंगावर गुलाबी कपडे होते, शाली,
स्कार्व्ज गुलाबी होते.
विरुध्दलिंगी आकर्षण आणि स्त्री किंवा पुरुष असणे
हेच तेवढे नॉर्मल मानणाऱ्या मानवी जगाने बाकी साऱ्या लैंगिकतेला धर्माच्या आणि
सत्तेच्या मदतीने शतकानुशतके दडपून टाकलेले. गेल्या शतकाच्या उत्तरार्धात जगात
निदान काही देशांत या वेगळ्या माणसांना ओळख मिळाली. त्यांच्या प्रेमाला मान्यता
मिळाली. नेदरलॅन्ड या देशाचा दिल तर फार उदार. इथे कुणाच्याही व्यक्तिगत
आवडीनिवडी, कपडे, लैंगिकतेच्या निवडींवर कुणी हिंसक प्रतिसाद सोडा आक्षेपही घेत
नाही. माणूस म्हणून तुम्ही चांगले वागलात की पुरते. तर इथल्या अमस्टेल नदीत,
कालव्यांच्या जाळ्यांतून आणि अमस्टरडॅमच्या कुशीत शिरलेल्या उपसागराच्या पृष्ठावरून
ती परेड जाते. या परेडसाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून वेगळ्या लैंगिकतेचे लोक येतात.
वर्षानुवर्षं आपल्या वेगळ्या लैंगिकतेच्या दडपणाखाली झुरमडून राहिलेले लोक या
निमित्ताने मोकळ्यावर येऊन आपले भय झुगारून देतात, तू एकटाच असा जीव नाहीस असे सांगायला
इतर समानशीलांची साथ त्यांना मिळते. आज इथे सर्वसाधारण लैंगिकता असलेली ‘नॉर्मल’ माणसेही त्यांचे
खुल्या मनाने स्वागत करतील. त्यांचा नॉर्मल जगण्याचा हक्क मान्य करतील.
एलजीबीटीक्यू म्हणजे एल-लेस्बियन-समलिंगी आकर्षण असलेल्या स्त्रिया, जी- गे-
समलिंगी आकर्षण असलेले पुरुष, बी-बायसेक्सुअल म्हणजे उभयलिंगी आकर्षण असणारे लोक,
टी- ट्रान्सजेन्डर- विचित्रलिंग- किंवा ज्या लिंगाची लक्षणे आहेत त्यापेक्षा वेगळे
वर्तन असणारे लोक आणि क्यू- क्वीअर यात लैंगिकतेचा सगळाच घोळ झालेली माणसे येतात.
साऱ्या जगात अशी कोट्यवधी माणसे आहेत. मागासलेल्या देशांत, समाजांत त्यांचे जगणे
मुश्किल होते. आपला वेगळेपणा न लपवता असा मोकळा श्वास घेता येणे अनेक प्रांतांत
अशक्य आहे.ण आणि
तर आज अमस्टरडॅममधे या वेगळ्या लोकांची आणि
त्यांचा केवळ माणूस म्हणून विचार करून त्यांच्या लैंगिकतेच्या हक्काला मान्यता
देणारी मिरवणूक असणार होती. ही परेड संध्याकाळी सुरू होणार होती. पण लोक यायला
सुरुवात झालेली.
त्या रंगीबेरंगी गर्दीत अमृता दिसली आणि आमच्या
डोळ्यात रंग उतरला. आता काही दिवस तरी आम्ही एकत्र असणार होतो. अरूणही संध्याकाळी
येणार होता. आम्ही बस पकडून फ्लॉवर मार्केटला गेलो. सिंगेल नावाच्या एका शांतसुंदर
कालव्यात पार्क केलेल्या हाउसबोट्सवरच हे फ्लॉवर मार्केट होतं. हे छोटंसं फ्लॉवर
मार्केट. खरं हॉलंडचं घाऊक फ्लॉवरमार्केट हे नव्हे. याला फ्लोटिंग
फ्लॉवर मार्केट म्हणतात. ब्लोमेनमार्क्ट. एका रांगेत पार्क करून ठेवलेल्या
हाऊसबोट्सच्या फळ्यांवर अंथरलेली ही फुलांची दुकानं. चौघेजण एकत्र फुलांफुलांतून चालत
निघालो... सारे मनातले काटे दूर गेले.
तिथे वेडच लागायची वेळ. इतके रंग, इतके आकार, एक
हलकासा सुवास... छतावर सुकवलेल्या फुलांचे गुच्छच गुच्छ लटकवलेले...
ट्यूलिप्स पाहायची संधी नव्हती पण फिर कभी म्हणत
समोरच्या फुलदाटीला सरआँखोंपर घेतलं.
काही खरेदी न करतो तरच नवल. तिथं फिरफिर फिरलो
आणि मग पुन्हा स्टेशनसमोर म्हणून जायला निघालो. अमस्टरडॅम स्टेशनच्या समोरून
वाहणाऱ्या अमस्टेल नदीच्या पात्रातून सुटणाऱ्या लाँचेस एका कठड्यापाशी उभ्या
होत्या. अरूण यायचा होता पाच वाजेपर्यंत. आत्ता वाजलेले पावणेचार. सहज लाँचफेरीची
चौकशी केली तर ती शेवटचीच सुटणारी लाँच होती. पाऊण तासाची फेरी असणार होती. पाच
वाजेपर्यंत सहज परतू अशा विचाराने उतरलोच. तिकिट काढताना लक्षात आलं की तो तिकिट
देणारा, लाँच चालवणारा, त्याचा एक सोबती असे तिघेही जरासे टिप्सीच होते. हसून
डुलून कायकाय बडबड चाललेली. तेवढ्यात तिकिटवाल्याने शंभर युरोमधले पैसे परत न देता
पन्नास युरोची नोट असल्यासारखे पैसे परत दिले. मी त्यांचा टिप्सीपण पाहून सावध
होते म्हणून बरं. दिले परत उरलेले पन्नास युरो त्याने सॉरीबिरी म्हणून. लाँचचा साहिल
तर एकदमच धुंदखूष होता. आसपासच्या गुलाबी वातावरणाचा रंग त्याच्या डोळ्यात
उतरलेला. बोटीत चढणारे सगळेच आनंदात होते. तो व्यवच्छेदक गुलाबी रंग ल्यालेले बरेच
जण होते. गुलाबी पिसांचा स्कार्फ गळ्याभोवती गुंडाळलेला एक तरूण आणि त्याचे
मित्रमैत्रिणीही आमच्या लाँचमधे चढले.
लाँच निघाली. डच साहिल एकदम छान माहिती देत होता. प्रत्येक कालव्यातून
जाताना कडेच्या घरांचा इतिहास सांगत होता, सायकलींनी खचाखच भरलेले स्टॅण्ड्स दाखवत
होता, अमस्टरडॅममधे सायकल चोऱ्या कशा होतात आणि मग लोक तात्पुरत्या म्हणून
चोरलेल्या सायकली कालव्यात कसे टाकून देतात तेही सांगत होता, नाझी कालखंडातल्या
कहाण्या, युध्दातल्या प्रसंगांची साक्षीदार घरे, सर्वात लहान-निरुंद घर वगैरे सारं
काही नीटच सांगत होता. आणि मग आम्ही जेव्हा खाडीच्या पृष्ठावर आलो तेव्हा सारा
माहौल बदललेला. गे परेड सुरू झाली होती. सजवलेल्या बोटींतून येणारी आनंदी मंडळी,
स्वतःच्या जसं आहे तसं असण्याचा अभिमान मिरवत होती. त्यांच्या वेषभूषा, रंगभूषा
सारे एका आनंदजत्रेचे रूप होते. त्यांची मौजमस्ती पाहायला, त्यांना आम्ही तुमच्या
वेगळेपणाचा आदर करतो, तुम्हीही मजेत जगा असं सांगण्यासाठी साऱ्या पुलांवरून,
काठांवरून लोकांनी गर्दी केली होती. बीअर पीत काही लोक कालव्यांतही उतरले होते.
कुणी रंगीबेरंगी फुगे सोडत होतं, कुणी कॉनफेटीचा वर्षाव करीत होतं... गाणी आणि नाच
होतेच. पण कानठळ्या बसत नव्हत्या. समोरून येणाऱ्या प्रत्येक आनंदनौकेवरच्या
प्रवाशांना हात करीत, हसत खिदळत आम्हीही चाललो होतो. तेवढ्यात दोन पोलिसनौका
आमच्या मागून आल्या आणि आमच्या लाँचला त्यांनी थांबवलं. तो मार्ग आज इतर बोटींसाठी
मोकळा नव्हता- तरीही आमचा खोडकर साहिल त्यात घुसला होता. मग त्याने अज्ञान व्यक्त
करीत क्षमा मागितली. आणि त्यांनी त्याला मागे परतायला सांगितलं. आता वेढा लांबचाच
पडणार होता. त्या डँबिस प्राण्याने आमच्याकडे वळून- क्षमा करा तुम्हाला माझ्यामुळे
अर्धातास ज्यादा बोटराईड करावी लागणार आहे असं डोळे मिचकावत सांगितलं. सगळे हसत
ओरडले... आता आमचा प्रवास त्या गे-परेडच्या रांगेतच सामील होऊन सुरू झाला. पाहाणारांना
आणि गे परेडवाल्यांनाही ही गडबड कळत होती. ते आमचं चुंबनं उडवून स्वागत करीत होते,
हसत होते. सगळीच धमाल. आमचा साहिल म्हणजे हिरोच झाला. कितीतरी वेळ गे परेडमधून जात
राहिल्यानंतर अखेर एके ठिकाणी त्याला पुन्हा एकदा कालव्याकडे वळावं लागलं. आणि मग
एका शांत गहिऱ्या कालव्यातून आम्ही आनंदयात्री पुन्हा पहिल्या ठिकाणी पोहोचलो.
इथेही पुलावर आता सगळ्या आनंदी लोकांची गर्दी
परेड बघायला लोटली होती. त्यात लिंगभेद नव्हता, वयाचेही बंधन नव्हते. मानवी
अस्तित्वाचा तो सोहळा होता. असा अचानकपणे हा सोहळा इतक्या जवळून पाहाता आला हा निव्वळ
योगायोग. प्लान करूनही हे साधलं नसतं. कुठेतरी एका ठिकाणी थांबून पाहावं लागलं
असतं तर आम्ही कदाचित् ते पाहात थांबलोच नसतो.
शुध्द मराठीत सॉल्लिड म्हणतात तशी धम्माल आली.