केव्हापासून एक गुणगुण मनात होते आहे
आठवणीतल्या त्या रस्त्याची.
घोलवड स्टेशन ते आस्वली गाव हे अंतर सात
किलोमीटरचं. थोडं जास्तच. १९७८-७९मधली गोष्ट आहे ही. तेव्हा मोबाईल्स नव्हते,
फोनही तुरळक असत. आस्वलीला जाणारी एस्टीबसही नव्हती. रिक्शाही जखमी झाल्याशिवाय
पोहोचू शकत नसत.
घोलवड ते आस्वली, आस्वली ते घोलवड ही
वाटचाल मी दर आठवड्यात दोनदा करत असे. असे नऊ-दहा महिने. सुरुवात केली ती जुलै
महिन्याच्या ऐन पाऊसकाळात.
घोलवडला उतरलं की तिथून रेल्वेच्या
पटरीवरून चालत बोर्डीजवळच्या लेवल क्रॉसिंगपर्यंत जायचं- (आता तिथे नवीन बोर्डी
स्टेशनच झालंय.) आणि मग तिथून कच्च्या रस्त्याने आस्वलीपर्यंत. जास्तीत जास्त एक तास दहा मिनिटांत पोहोचायचं
असं मनात धरून झपझप चालत रहायचे. चालताना कधी सोबत असे कधी नसे. पण तो काळ मनात
भीतीला स्थान मिळण्याचा नव्हता.
पावसाळ्यात रस्ता कापताना मधल्या
रस्त्याने जायचा मात्र विचारही करवत नसे. पटरी टाकून खाली उतरून मधल्या शेताडीतून
गेलं तर एक किलोमीटर अंतर कमी होत असे. पण पावसाळ्यात तिथं गच्च गवत, वेली-झाळ्या
फोफावलेल्या असत. अनेक ठिकाणी चिखलाची डबकीही असत. तिथनं जाणं अवघड वाटे.
त्यापेक्षा सरळसोट पटरीच्या फळ्याफळ्यांवरून पावलं टाकत जाणं जरा कंटाळवाणं वाटलं
तरीही बरं असे. पावसाळ्यात पटरीच्या कडेनेही भरपूर दाटी झालेली असे. त्यामुळे खाली
पाहून चालताना त्या हिरव्या गर्दीतले चेहरेही हसून साथ करत. लाल एरंड, वेगवेगळी
गवतं, घोटवेलीचे ताणे, स्पिट बीटलच्या थुंकीचे फुगे, किडेमकोडेनाकतोडे...
बाजूने कधीतरी खडाडखडाड करत गाड्या
जायच्या. एकादं कार्टं ओरडायचं, ओय किधर चले अकेलेअकेले... तेव्हा हिंदी सिनेमांची
गाणी जास्त मातलेली नव्हती आणि लोकही. माझ्या पाठीवर खाकी हॅवरसॅक म्हणजे एक दणकट
दप्तरच असायचं. अडचण नको म्हणून छत्री नसायचीच. फाटका रेनकोट पाठीवर दफ्तर
राखायचा. तोही कशी भिजत चाललीय असं कुणी म्हणू नये एवढ्यापुरताच असायचा.
पटरी तुडवत लेवल क्रॉसिंगपाशी आलं की लगेच
पलिकडे एक पाडा होता. चारपाच घरं होती. तिथं एक विहीरही होती. आधी औत्सुक्याने
पाहात रहाणारी लाहानी पोरं नंतरनंतर ओळखीचं हसत. एकटं चालत असलं की एक स्वातंत्र्य
असतं. आपली पावलं विशिष्ट लयीत टाकायची, वेडीवाकडी टाकायची, तहान लागली तर
आकाशाकडे पाहात पावसात आ वासायचा. डोळ्यावर चष्मा असायचा तो काढून टाकायचा.
शेजारच्या कुणाच्या चेहऱ्यावरचे भाव टिपायचा, किंवा कुणी आपल्याकडे काय कसं
पाहातंय याची नोंद घ्यायचा प्रश्न नसायचा.
मी तेव्हा अगदी बारीक, काटकुळी होते. पण
कडक. चालायचं काही वाटायचं नाही, भिजायचं काही वाटायचं नाही, उन्हात तापायचं काही
वाटायचं नाही, अनवाणी पावलं कुरकुरायची नाहीत कधी. पायात साधीच चप्पल असायची. ती
चिखलाला चिकटू लागली, तुटली की ती हातात घेऊन चपकचपक अनवाणी चालू लागायचे मी बिनधास्त.
वाटेतल्या झाडाझुडूपांआड आटपून घ्यायलाही काही वाटायचं नाही. भुकेचं काही वाटायचं
नाही, तहान लागली तर कुणाकडचंही पाणी घेऊन कसल्याही भांड्यातून प्यायला काहीही
वाटायचं नाही. पाण्यातला काडीकचरा वगळून घोटघोट पाणी पिण्यात काही नवल नव्हतंच.
सोबत सहजपणे घेऊन जाव्या अशा पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या नसत. लहान
मुलांच्या वॉटरबॅग्ज नाहीतर मग जड काचेच्या बाटल्या हेच पाणी सोबत नेण्याचं साधन
असे. त्यापेक्षा हे कुठेही पाणी पिणं सोप्प होतं.
पटरीचा रस्ता संपल्यानंतर कच्च्या
रस्त्याला लागलं की चिखलाचं राज्य असायचंच. बैलगाड्यांनी पडलेल्या अस्पष्ट
चाकोऱ्यांतून चुळकाचुळका पाणी साठलेलं असायचं. त्यांच्या मधल्या जागेतली जमीन जरा
उंचवट्याची आणि घट्ट असायची. त्यावरून चालायचं. रस्त्याकडेला वीतभर वाढलेलं गवत
असेल तर त्यावरून चालायचं. एकेक टप्पे ठरलेले असायचे. एक भलाचांगला पिंपळवृक्ष
होता. तिथं बहुतेकवेळा कुणीनाकुणी विसाव्याला टेकलेलं असे. आपणही टेकायचं. कोठ्
चाल्ले. आस्वाललं. आमी तं नागबंधावं जांव. चला हारीच जांव. असं काहीबाही बोलणं
होई. किंवा मग डॅहॅणूंलं. बॉर्डीं जांव बाजारलं. अशी नेमकीच देवघेव होई. मग कोणी
विचारे- धनजी नॅहीं... कोठ आहें,. आस्वाललं? मुंबईलं.
येनार आहें कां. हो येईल उंधी. उंधी? सांगजोस तेलं. – मिलला
होतां म्हन.
मग येई नागबंध पाडा. तिथे सुंदरचं छोटंसं
दुकान. तिथं पाणी पिऊन पुढे सरकायचं. मग रामजी भेसकरचं घर. तिथं हाक मारून पुढं.
मग माझी खूप आवडती जागा. डावीकडे नदीचं वळण यायचं. तिथे वाटेवर झुकलेली झाडं,
बांबूचं बेट असा एक सुंदर टप्पा होता. त्या तिथे रस्ता सोडून आत झाडीत घुसलं आणि
नदीच्या काठाकाठाने गेलं तर आमच्या सेंटरच्या झोपडीच्या मागून जाता यायचं. आणि
रस्ता नाही सोडला तर सरळ जाणारा रस्ता पुढे आता धरण झालंय तिकडे जायचा. आणि
गावठाणपाड्याकडे आमच्या घराकडे वळणारा डावीकडे वळायचा. वळलं की पुन्हा उजवीकडे एक
कवरी विणायचा ‘कारखाना’ होता. कवरी म्हणजे काय, तर पावसाळा उलटल्यानंतर भाताचे पेंढे सोनेरी
सुकून गेले- त्याला वारली भाषेत पुली म्हणत- की ते विणून, गुंफून औषधाच्या काचेच्या
बाटल्यांसाठी कव्हर्स विणली जात. नेआणीमधे त्यांची फुटाफूट होऊ नये म्हणून पॅकिंग.
त्यानंतरच्या काही वर्षांतच पॅकिंगचं सामान बदललं आणि कवरी विणायचा कारखाना बंद
पडला. तर तिथं गावातल्या पोरीसोरी कवरी विणत बसलेल्या असायच्या. एका कवरीला पंचवीस
पैसे असा काहीतरी रेट होता.
मला बघून त्यांचा कल्ला झाला की बरं
वाटायचं. राती येव हाँ चं भरघोस आश्वासन देऊन मला निरोप. तिथून दहा मिनिटांवरच
आमचं सेंटर होतं. कुणीतरी मागून ओरडायचं- जा लाहौ. धनजी वांट हेंरत आहे. आणि हसू
उधळायचं. धनंजय आणि माझं लग्न होणार याची अर्थातच आम्ही सोडून सर्वांना खात्री
होती.
धनंजय किंवा प्रताप किंवा तिथे जाणारे
कुणीही लोक चालताना बरोबर असले की चालताना मनाशी रमणं व्हायचं नाही. बोलण्यात,
खिदळण्यात नाहीतर भांडण्यातच वाट सरायची. पण कितीतरी वेळा मस्तराम एकट्ने चालत
यायला प्रचंड आवडायचं मला. सभोवारच्या अर्धा मैल परिसरात तर शांतीत शांती. कोतवाल,
कावळे, बुलबुलांचे मधूनच आवाज. किड्यांची किर्रकिर्र, खुसफूस, सरड्यांची खसफस,
डबक्यातून बेडूक दचकायचे त्यांची प्लॉपप्लॉप पळापळ, किंवा पाऊस पडत असेल तर
ड्राँवड्राँव... आपल्याच पावलांचा आवाज फक्त सतत.
क्वचितच कधीतरी मला एकाटसुनसान रस्त्याने
जाताना धास्ती वाटली असेल. पण ती धास्ती एखादी ओहोटीची लाट उगीच कुचमत पुढे यावी
तशी असायची. मी अनेकदा सकाळीच निघून दुपारी पोहोचणाऱ्या गाडीने येत असे. म्हणजे
आईबाबांचा आग्रह दिवसाउजेडी जा एवढाच असायचा बिचाऱ्यांचा. पण अकरा वाजता घोलवडला
पोहोचलं की ऐन मध्यान्हीच्या उन्हातून चालावं लागायचं. जुलै-ऑगस्टमधे ठीक होतं.
सप्टेंबरमधे कधी पावसाने दडी मारलेली असली की चटचट तापायचं सगळं. मधूनच आकाशाकडे
विनवून पाहात, सावळ्या ढगांसाठी डोळे लावत चालायचं. ऑक्टोबर मध्यावर चिखल सुकू
लागलेला असे. मग एकदा आम्ही प्रथमच पटरीने न जाता पटरीवरून खाली उतरून त्या मधल्या
रस्त्याने गेलो. काय सुंदर वाट होती ती. दुतर्फा शेताडी नाहीतरी उंचवट्यांवरल्या
झाडांच्या रांगांत गुंतलेल्या वेली. कुठेतरी मधेच लपणातून डोकावणाऱ्या वारली
झोपड्या.
मग नंतरच्या सगळ्या फेऱ्या त्याच वाटेने
झाल्या. पाऊण मैल अंतर कमी असेल तसं त्या वाटेने पण वेळ जवळपास तेवढाच जायचा. कारण
खुणावणारे थांबे जरा जास्तच होते. वाटेत आदिवासी ग्रामसेवकाचंही घर होतं. तिथं
पाणी प्यायला थांबल्याशिवाय त्याच्या पोरांशी गप्पाटप्पा केल्याशिवाय पुढं जाताच
येत नसे. शिवाय वाटेत बोरंही थांबवायची. काहीच नाही मिळालं तर तोंडात टाकायला
गुंजेचा गोड पाला तरी देतच असे उदार वाट...
एक जागा होती- सरळ बैलगाडीच्या
चाकोऱ्यांनी पाडलेली वाट. तिचं पुढचं टोक म्हणजे आंधळं वळण. पलिकडून कुणी येतंय का
दिसायचंच नाही. कुठलंतरी रहस्य त्या वळणापलिकडे भेटेल की काय अशी हुरहूर लावेल असं
वळण. तिथंच थांबून रहावं किंवा तिथून पळत सुटावं असं काहीसं वाटायचं. पण
दोन्हीपैकी काहीच कधी केलं नाही. संथ गतीने चालतच रहायचं. एकदा त्या वाटसांदीत
शिरले आणि मागून कर्रकर्र ऐकू येऊन थबकले. आस्वलीचा दत्तू बैलगाडीवर बसून येत
होता. मला बघून आनंदात ओरडून त्याने
बैलगाडीत बोलावलं. “चल, हारींच जांव.” मी आनंदाने पुढच्याच बाजूने
चढायला गेले- गाडीत बकरीच्या लेंड्या भरलेल्या! मी पाहातच
राहिले. तेव्हा दत्तू म्हणाला- “क्या नॅहीं हॉत. बस, झटं.” मी त्या वाळक्या लेंड्यांच्या घुळघुळ्या गादीवर आरामात बसले. थोड्या
वेळाने आपण कशावर बसलोय वगैरे विसर पडला आणि
चाळीस मिनिटांचा चालचाल रस्ता बैलपावली वीस मिनिटांत संपला. त्या लेंड्या
कुणाच्या तरी बागेत घालायला दत्तू चाललेला.
मग एकदा संध्याकाळची गाडी लेट झाली. आणि
हिंवाळी तोकड्या दिवसांत साडेसहालाच अंधार झाला. घोलवडला आमच्या सेंटरच्या
शेजारच्याच झोपडीत रहाणारा दशमादा भगत आणि त्याची बायको नि एक पोरगी भेटले- मग
काय- “चल, हारींच जांव.” दशमादा भगत म्हणजे ताडीबहाद्दर. पण आता हारींच म्हणजे हारींच. सुटकाच
नव्हती. ते सगळे रमतगमत चालत होते. मी सांगितलं- चालां झटं... लाहौ करा... तर हसले
माझ्या घाईला. आणि मधेच दशमादा सुळ्ळकन एका घराकडे वळला. तोवर इतका अंधार मिट्ट
झालेला की एकट्याने जाते म्हणण्यातही अर्थ नव्हता. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार
नाही. मग त्यांचं साग्रसंगीत ताडी गरम करून पिणं सुरू झालं. फक्त चुलीतल्या
निखाऱ्यांचा उजेड आणि वर दिसणारी आकाशगंगा. मग चिंता सोडून आकाश भरून घेतलं, ते
आजवर पुरलंय. अखेर साडेनऊपावणेदहाला मंडळी हालली. आणि म्हटली- चंलां, आता जांव
झटं. मुघाबायला लेट झालां. चांला झटं. लाहौं. साडेदहाला सेंटरवर पोहोचले तेव्हा
धनंजय, प्रताप सगळ्यांनी हजेरी घेतली. मागे दशमादा तराट उभा. ओय- क्याला कजा करता.
आम्हीं हारींच आलो. सगळं सांगितल्यावर सगळे हसूनहसून मेले. दशमादाची सोबत म्हणजे
लेटच.
पाठोपाठच्या एका संध्याकाळी घोलवडला उतरले
आणि त्याच लाडक्या मधल्या रस्त्याने चालू लागले. तर एक वारली तरूण मुलगा पाठोपाठ
आला.
कोठ जास? आस्वाल?
हो.
सेंटरवर?
हो. तू कुठला.
मी जेठू. डोल्हारपाड्यात. चल, हारींच
जांव.
हारींच जांव.
दे तुझी ब्याग घेतो.
राहू दे. हलकीच आहे.
मग तो कुठे असतो, काय करतो वगैरे जुजबी
चौकशी करून आम्ही चालू लागलो. तोही पूर्वी सेंडरवर येत असे म्हणाला. आता उंबरगावला
सायकलच्या दुकानात कामाला होता.
आम्ही चांगले भरभर चालत होतो. थोड्या
वेळाने मी पाणी प्यायला थांबले तेव्हा तो पुढे जाऊन उभा राहिला. त्याला वाटलं
असावं पाणी प्यायले म्हणजे मी दमले असणार. म्हणाला, देस् तुझी ब्यॅग, मी घेतो.
दिली.
सेंटरवर पोहोचण्याच्या जरा अलिकडेच
डोल्हारपाड्याचा फाटा होता. त्याने मला बॅग दिली नि तो निघाला. म्हटलं चल सेंटरवर
चहा प्यायला. तर नको म्हणाला. आणि झुळकन्न् नाहीसा झाला.
मी पोहोचल्यावर सहजच सांगितलं की मला
असाअसा जेठू नावाचा मुलगा भेटलेला. दत्तू, धर्मा, बाबू, धनंजय सर्वांचीच तोंड
पालटली. मग तो असा होता का तसा होता का... मी सांगत गेले. तो उंबरगावला सायकलच्या
दुकानात कामाला आहे म्हणून सांगितल्याचं सांगितलं. माझी बॅगही त्याने उचलल्याचं
सांगितलं तसं सगळ्यांचेच हात कप्पाळावर गेले.
“आणि परत पण दिली?”
“हो…”
“अरे तू म्हणजे थोर आहेस
बाबा. अगं तो जेठू म्हणजे- फरार आहे. चोर आहे. कुणालातरी मारलंही होतं म्हणतात.”
“आता मला कसं कळणार. आणि
माझ्याशी नीट बोलला. बॅगही परत दिली ना. मग झालं तर.”
पण त्यानंतर माझं संध्याकाळी एकट्याने
सारा रस्ता चालत येणं सर्वानुमते बंद करण्यात आलं.
त्यानंतर काही महिन्यांनी कळलं जेठूचा
कुणीतरी खून केला. मिटला तो.
सात किलोमीटरच्या वाटचालीत एका एकट्या
मुलीबरोबर तो भलेपणानेच वागला होता हे तर मिटत नाही.
नंतर मी सांध्यरंग वाटेवर उतरलेले पाहिले
ते धनंजयच्याच सोबतीने, पायाखाली चांदणे उलगडलेले पाहिले तेही त्याच्याच सोबतीने.
दिवसाची टळटळीत वाटचाल मात्र अनेकदा
एकट्याने करायची संधी घेत राहिले. आजवरही...
आस्वलीला
पावसातून पोहोचायचो तेव्हा बरोबर अनेकदा पातीचहाची जुडी नि चार काड्या पुदिना अशी
वीस पैशाची जुडी किंवा आठ आण्याच्या तीनचार जुड्या घेऊन जात असू आम्ही.
हाडापर्यंत भिजत, कातडं लिबलिब होईपर्यंत पाणी मुरवत पाच मैल तुडवत गेलं की जे कुणी घरात म्हणजे सेंटरवर असे त्याने दुरूनच पाहून रॉकेल असेल तर स्टोव् नाहीतर चुलीतली आग पेटवलेली असे. भांड्यात पाणी तापत टाकलेलं असे. त्यात ती अख्खी जुडी लोटून देऊन- भरां उकळू देजोस हौ.- चहा-साखर आणि दुधाची भुकटी सावकाश लोटायची. मग आमचे एनॅमलचे मग्ज भरून तो पातळ लज्जतदार, गोड चहा आम्ही सारे घ्यायचो. चहात बुडवायला बडबडच असायची हातातोंडाशी.
हाडापर्यंत भिजत, कातडं लिबलिब होईपर्यंत पाणी मुरवत पाच मैल तुडवत गेलं की जे कुणी घरात म्हणजे सेंटरवर असे त्याने दुरूनच पाहून रॉकेल असेल तर स्टोव् नाहीतर चुलीतली आग पेटवलेली असे. भांड्यात पाणी तापत टाकलेलं असे. त्यात ती अख्खी जुडी लोटून देऊन- भरां उकळू देजोस हौ.- चहा-साखर आणि दुधाची भुकटी सावकाश लोटायची. मग आमचे एनॅमलचे मग्ज भरून तो पातळ लज्जतदार, गोड चहा आम्ही सारे घ्यायचो. चहात बुडवायला बडबडच असायची हातातोंडाशी.
आता एक धाकला मित्र विचारतोय- तुमच्याकडे
तेव्हा रमबिम नसायची कां... म्हटलं तेव्हा पैका फार महाग होता लेका. परवडायचं नाही
काही. ताडी प्यायला परवडायची. पण मी ती उगीच चवीपुरती चाखलीय.
ताडी पिण्याची गंमत. मुलगा नि मुलगी यांनी
एकमेकांना संगतीच जगण्याचा होकार दिला की नाही यासाठी एक परीक्षा असे. मुलगा
मुलीला सुर प्यायचं- म्हणजेच ताडी प्यायचं निमंत्रण देत असे. ती हो म्हणाली तर
पटली. नाही म्हणाली तर कटली. असा हिशेब.
धनंजयची नि माझं बराच काळ भवति- न भवति
चाललं होतं. म्हणजे म्हटलं तसं- सारा गाव जाणत होतं की आम्ही नवरास् न बेहलसं. पण
आमचंच नक्की होत नव्हतं.
मग जानेवारीच्या एका पौर्णिमेच्या आदल्या
रात्री आम्ही एकमेकांना फायनल हो म्हणून टाकलं. ती बातमी पोरांना रात्रीतच कळली
होती. ती सकाळी पसरलीच.
मग “धनजी, मुग्ताबायला सुर पाज.
पियाली तरच खरं.” असं प्रत्येकानेच सांगून झालं.
मग नदीचं पात्र ओलांडून आम्ही गेलो. तिथं
ताजी काढलेली गोडी ताडी धनंजयने मला ऑफर केली. आणि मी ती एका पानाची दोन टोकं
चिमटून धरलेल्या द्रोणातून प्यायले बा. मग बातमी अधिकृतपणे पसरली. चिडवणे,
मस्कऱ्यांना ऊत आला. अशी सुर प्यायची गंमत... धनंजय ताडी पिणं एंजॉय करायचा. मला
नाहीच आवडली तिची चव कधी. पण हा संदर्भ मात्र खूप गोड वाटला.
गोडच होते आमचे वारली मित्रमैत्रिणी.
एकदा सगळ्या पोरींनी रात्रीचा अक्षरओळखीचा
वर्ग झाल्यावर मला नाचायला यायचं आमंत्रण दिलं. आणि लक्षमने सांगितलं की- “मुग्ताबाय, तू आज नाचाले
माझी साडी नेस हौ.” तिनं साडी दाखवायला आणलीच होती.
बोर्डीवरून आणलेली नवी कोरी हिरवीकंच लालछटेची मऊ सुती साडी.
मी म्हटलं अगं नवी साडी आहे. तूच नेस. “नाहें. आज तू. उंधी मी. बघ
कशी मस्स्तं दिसशील. तू तं पारशीन जशी गोरीगोरी नं.”
तिचा आग्रह खरा होता. मी ती साडी नेसले
अखेर. मग कौतुक- बघ कशी पार्शीनजशी नांगाय...
मग नाचायला गेले. ती साडी तशी बरीच मोठी
होती. ती घेऊन मला काही नाचता येत नव्हतं. पण त्यांनी मला फेरात सावरून घेतलं. हसणं,
खिदळणं... धमाल. रात्री घरी परतल्यावर तिला साडी घडी करून परत दिली.
दुसऱ्या दिवशी पाहिलं लक्षम ती साडी नेसून
आलीच. तिने आता त्या साडीचे दोन भाग केले होते. एका साडीत दोन साड्या... एक तिला,
एक तिच्या आईला. म्हणून तिने काल रात्री घाई केली होती. फाडायच्या आधी आखुटच साडी
मुग्ताबायला नेसवायची होती...
कधी न विसरण्याची गोष्ट. कोण नवी साडी घडी
मोडायला देतं सहजपणे- आई मुलीला नाहीतर सुनेला देते ते सोडलं तर...
No comments:
Post a Comment