या गरीब वारल्यांकडे थोडी मातीची भांडी,
अल्युमिनियमची भांडी, चूल, एखादी तट्ट्याची चटई एवढंच सामान असायचं. या कुडापासून
त्या कुडापर्यंत टाकलेल्या एक दोन आडव्या बांबूंवर सर्वांचे कपडे टांगलेले असत.
प्रत्येकाकडे दोन जोड. कधीकधी तर एखादाच.
काठी, कुऱ्हाड, विळा, पहार अशी काही आय़ुधं
असायची.
सगळ्या झोपड्यांच्या बाहेर एक कारवीच्या
कुडांचा चौकोन करून बांबूच्या स्टॅण्डवर ठेवलेला असायचा. पिण्याचं पाणी त्यावरच्या
मडक्यांत भरून ठेवलेलं असायचं. घराच्या बाहेर असं पाणी ठेवण्याची- आल्यागेल्या
कुणालाही पाणी पिता यावं अशी पध्दत इथंच पाहिली.
घरात चुलीजवळ एखादं भांडं भरलेलं असायचं.
भात शिजवण्यापुरतं. तवाही असायचा. किंवा मग एकमेकांकडून मागून घेत असतं. ओतभाकरी
करायची पध्दत असे पण ती फारवेळा केली जात नसे. नवा लाल तांदूळ आला की तो नवा चवदार भात खाणं किती मनापासून करायचे
आमचे वारली. तो खाऊन पोटं फुगायची आणि मग ढमाढम पादण्याची नि पाठोपाठ खदखदून
हसण्याची स्पर्धा. त्या
पादण्याचा जोरदार उत्सव हसण्याच्या घोषात सुरू रहात असे.
चांगलं सुग्रास अन्न म्हणजे काय हे माहीत असलेल्या आम्हाला त्या
आनंदाने आतल्या आत चुपचाप गलबलून यायचं.
आता मात्र परिस्थिती बरीच बदललीय. भाताबरोबर तेल, भाज्या, कोंबड्या आहारात येऊ लागल्यात.
तेव्हा मात्र तेलाचा वापर फारसा नसलेलंच अन्न असे त्यांचं. स्निग्धांश, प्रथिने, चौरस समतोल वगैरे सगळं कुठेतरी दूरदूर कुणाच्यातरी पाठ्यपुस्तकांत मिटून राहिलेलं असायचं.
आता मात्र परिस्थिती बरीच बदललीय. भाताबरोबर तेल, भाज्या, कोंबड्या आहारात येऊ लागल्यात.
तेव्हा मात्र तेलाचा वापर फारसा नसलेलंच अन्न असे त्यांचं. स्निग्धांश, प्रथिने, चौरस समतोल वगैरे सगळं कुठेतरी दूरदूर कुणाच्यातरी पाठ्यपुस्तकांत मिटून राहिलेलं असायचं.
या समाजात कोंबडीही क्वचित, बकरा
तर दुरापास्तच. गुरं पाळून दूध काढायचं त्यांच्या परंपरेत न बसणारं. म्हणून
दूधदहीताक वगैरे प्रश्नच नसायचा. माहीत असलेले कंद उकरून भुजून खायचे. आठवडाबाजारात
मोळ्या घेऊन गेलेल्या बाया परतताना चवळी, चणे-हरभरे ही
कडधान्ये- उच्चारी च्यवळी, च्यनं- घेऊन कधीमधी येत. एक अगदी
बारीकशी- क्वार्टरची किंवा त्यापेक्षाही लहान तेलाची बाटली भरून आणत. त्याचा उपयोग
डोकीला लावाले, आणि कधीमधी आंबटातच थेंब दोन थेंब ओताले. आस्वलीतला
एक भिवा डोल्हारी नावाचा वारली नियमितपणे एक मोठी बाटली तेल वापरायचा तर आख्खं गाव
त्याला तेलची म्हणायचं.
कोंबडी हळदमीठतिखट लावून बारीक तुकडे करून चुलीत भाजायची. तांदळाच्या
कालवलेल्या पिठाची ओतभाकरी करून तिच्याशी भाजके बोंबील, किंवा भाजलेलं खारं. आजोळ्याच्या बियांची सुकट घातलेली
किंवा नुसती मिरची घातलेली चटणी खायची.
नदीचे मासे, पावसाळ्यात मुबलक मिळणारे बेलकडे
म्हणजे खेकडे, कधीमधी गावणारे रानपक्षी काटक्यांच्या आगीत
होरपळवून चुखून खाणे हे असलेच प्रथिनांचे सोर्सेस. पावसाळ्यात रानात मिळणाऱ्या
लहान बोराएवढ्या शंखांतला- खुबं म्हणायचे ते- बाऊ मडक्यांत गोळा करून आणायच्या
बाया.
त्यांच्या जेवणात धान म्हणजे भात हे मुख्य. कालवणासाठी आंबट घालायला
चिंचा, नाही तर कैऱ्या, कुसुंबाची
आंबटढाण फळं, काकडं, काही पिकवलेल्या
भाज्या, स्वस्तात मिळवलेले सुके मासे वगैरे. हे सारं पाण्यात
उकळत ठेवायचं. हे सगळं करताना ते सगळं पाण्यात तिखट, मीठ,
चैनीसाठी लसूण ठेचून घालून उकळवायचं बस्स. बांबूचे कोंब त्यातच
ढकलायचे. बोरं, करवंद, काहीही त्यात
ढकलायचं... हीच चैन. बांबूच्या कोंभामुळे त्या सर्वाला एक उग्रस वास यायचा. माझी
ते खाण्याची हिंमत झाली नाही कधी. ते पाणी भातात जिराकजिराक घालून भाताशी खायचं.
दिवाळीतला सर्वांचा लाडका मेन्यू म्हणजे भिजवून उकडलेल्या मीठ
लावलेल्या चवळ्या, भाजलेले जाडे बोंबील आणि पानात
वाफवलेली धानाची भाकरी.
आमच्या सेंटरवर तशा बऱ्याच वस्तू होत्या.
पण कधी कुठल्या वस्तू इकडेतिकडे झाल्या नाहीत कधी. साबणाची वडी झिजून बारकी झाली
की मात्र हमखास गायब व्हायची. आणि मागून नेत कधीकधी ते लाल तिखट आणि मीठ. ते आम्ही
आणून ठेवलेलं असायचं. लाल तिखट आणि मीठ घालून ‘च्यटना कुटून खांव’ हा आवडता
कार्यक्रम असे. चिंचा, कैऱ्या, कच्ची करवंद, सुके बोंबील... सारे च्यटना कुटून
खांवच्या रांगेत असायचे.
एक दिवस अक्षरं शिकायला येणाऱ्या सगळ्या
पोरींनी मला ‘उंधी
डोंगरावर ये आमच्याहारीच’ असा आग्रह चालवला. त्या बकऱ्या
चारायला डोंगरात जायच्या. तो दिवस कायम लक्षात राहील. सकाळीच फक्त चहा पिऊन नि एक
लहानसा पाव खाऊन मी निघाले त्यांच्यासोबत. परत कधी यायचंय वगैरे काहीच विचारलं
नाही.
निघाले तेव्हा धनंजय हसला. तू जातेस? बघ बाबा... (तोवर आमचा
एकमेकांना होकारबिकार काही झाला नव्हता.) मी निघाले. करडं नि शेळ्या आणि सातआठ
पोरी, तीन पोरं, आणि एक मोठी बाई आणि मी असे आम्ही निघालो. पावसाचेच दिवस होते.
डोंगर पावसात भिजून चिंब झालेला. सारे खडक चकचकीत किंवा मग हिरव्या मॉसने किंवा
गडद हिरव्या शेवाळाने झाकलेले. शेवाळाने झाकलेले गडद काळेहिरवे खडक महा धोकेबाज.
आपटी खाणारच. त्यावरून आम्ही सारे टणाटणा उड्या मारत चाललेलो. थोड्या वेळाने
पावलांना आपोआप अक्कल येते कुठे टेकायचं नि कुठं नाही.
सोबतची सोनीबाय कंबरेला एक गाडगं बांधून
चालली होती. दगडांतून चालताना वाकून काहीतरी वेचत होती आणि पदराच्या शेवात टाकत
होती.. काय करतेय पाहिलं तर ती डोंगरातले खुबे किंवा गोगलगायी वेचत होती. तेव्हाच
कळली ही खुबे खाण्याची खुबी. तिला विचारलं याचं काय करायचं. तर तिने केसातून एक
हेअऱपिन काढली. आणि तिच्या टोकाने ते खुबे कसे उचकटायचे आणि त्यातलं मांस कसं गोळा
करायचं ते दाखवलं. वाटेत करडं चरत थांबली आणि तिथं खुबं नसतील तेव्हा ती पटापटा ते
खुबे पिनेने उघडून त्यातलं मांस गाडग्यात टाकायची. आंबट ब्येस हुतंय म्हणाली.
सूर्य बाहेर डोकावतच नव्हता त्यामुळे दिवस
किती चढलाय हे कळायला मार्गच नव्हता. सोबत घड्याळही आणलेलं नव्हतं. किती वाजलेत हे
भुकेवरूनच ओळखायचं होतं. शेवटी भूक कोकलायला लागली तेव्हा मी पोरींना विचारलं, आता
घरी जायचं. त्या खिदळल्या. म्हटल्या हे मुग्ताबाय दमली. म्हटलं- नाही पण भूक
लागली. तुम्हाला नाही लागली? तर त्या नुसत्याच खिदळल्या. सोबत एक रतना नावाचा मुलगा होता. शाळेत
नियमितपणे जाणारा आणि नीट शिकत असलेला तो एकटाच मुलगा. तो म्हणाला. “हो भूक लागली. पेक तांव,(थांब जरा). मी आणतोय कायतरी.” ती पोरं पटापटा एका झाडावर चढली आणि गदागदा त्यावर नाचली. सगळीकडे हिरव्या
टोकेरी फळांचा सडाच सडा पडला. सगळी पोरं वाकून ती गोळा करू लागली. चारदोन मीही
उचलली. त्यांनी आणखीही दिली. पोरांनी जसं केलं तसंच मीही केलं. ते टपोऱ्या
बोराएवढं फळ जाड हिरव्या-पिवळट सालीचं होतं. आणि सोलल्यावर आत पिवळसर तांबूस
पारदर्शक सुंदर दिसणारा गर. खाल्लं. अरे देवा... देवच आठवला. इतकं आंबट फळ कधीच
खाल्लं नव्हतं आधी. ती पोरंपोरी पटापट फळं सोलून खात होती.
“खा, मुग्ताबाय, रानात हेच
खाया.” मी आणखी चारपाच फळं निकराने खाल्ली. जीभ जणू सुन्न
झाली तेव्हा आणखी थोडी खाल्ली. त्या फळांचा परिणाम उलटाच होता. इतकं कडूआंबट आम्ल
होतं त्यात की त्याने भूक वेडीपिशी झाली. त्या मुलांच्या जठराला कसलीकसली ‘सवं’ झाली असेल कल्पनाच करा.
नंतर संदर्भ शोधले, कोशिंब किंवा
कुसुंबाची फळ अशी सर्रास कुठे खाल्ली जातात असा एकही संदर्भ मिळाला नाही.
सोनीबाय कुठंशी गायब झालेली. ती परतली.
तिनं सोबत एक भाकरी आणि कवटाचा म्हणजे तिच्या घरच्या कोंबडीच्या अंड्याचा पोळा
आणलेला. तिच्या जुनाट भिजक्या साडीच्या एका गाठीत एका पानात बांधलेली ती शिदोरी
तिने सोडली. बाकीच्या या पोरांकडे काहीच नव्हतं. ती फळं खाऊन सारी ओढ्यावर भरपूर
पाणी पिऊन पुन्हा रानोमाळ झाली. सोनीबायने मला तिच्यातली अर्धी भाकर आणि पोळा ऑफर
केला. कशी घेणार होते मी. ही सारी पोरं उपासपोटी फिरत होती. सोनी म्हणाली, “तू खा मुघाबाय, त्यांचं
काय नाय. सवं.” मी तिच्या शब्दाचा मान राखायचा म्हणून
चतकोरातला नितकोर घास घेतला. त्यात मीठ नव्हतं काहीच नव्हतं. पण तो केवढा अलगद
पोटात जाऊन समाधान देऊ लागला. मग तिने त्या भाकरीतले आणखी चार तुकडे जवळच
खेळणाऱ्या चार पोरींना दिले. त्यांनी ते खिदळतच खाऊन टाकले... मग सोनीबाय वाटणीला
उरलेली अर्धी भाकर खाऊन पुन्हा खुबं धुंडाळू लागली.
आमच्या पोरींच्या काय गप्पा चाललेल्या,
काय खिदळणं चाललेलं, मला काहीसुध्दा आठवत नाही आता. मी भुकेनं झेलकांडले होते. वाटेत
मिळेल तिथल्या ओढ्याझऱ्याचं पाणी पोटभर पीत होते. ते कितीवेळा रिकामंही होऊन जात होतं.
कारण थंडगार पाऊस मधूनच भिजवत होता. कपडे अंगावरच सुकवत तशीच नेटाने चालत... ती
पोरं बघ कशी असं स्वतःला दटावत चालत राहिले होते. कुसुंबाच्या फळांचा फराळ चाललाच
होता त्यांचा. सप्टेंबरमधलं रान अगदीच कंजूस असतं, खायला काही म्हणून काही देत
नसतं ते आपल्याला हे कळलं. नुसतंच हिरवं सौंदर्य- पोट नाही भरत त्याने. पोट भरलेलं
असलं तरच भोवतीचं सौंदर्य डोळ्यांत उतरतं हा धडा आपोआपच शिकले. साग, ऐन, शिवण,
कुसुंबांच्या ऐन गर्दीत काय खायला मिळणार?
अखेर एकदाचे सगळे परतीला लागले. सेंटरवर
पोहोचले तोवर साडेचार वाजून गेले होते. कशीबशी जाऊन बसले आणि रामजीला विचारलं,
काही आहे काय रे दुपारचं उरलेलं. काहीच नव्हतं. धनंजयने एक पाव शिल्लक ठेवलेला.
त्यांचा नुकताच पिऊन झालेला चहा. त्यातला थोडा उरलेला. मी भुकेजून येणार याची
खात्रीच होती धनंजयला. त्या दिवशी तो एक लहानसा पाव नि चहा किती महत्त्वाचा होता.
दुकानातला पाव संपून गेलेला. त्यामुळे भात शिजेपर्यंत तेवढंच.
मी कुणाच्याही भुकेची काळजी अजूनही आपोआपच
घेते याचं कारण त्यादिवशी अनुभवलेली, पोट चिरणारी भूक हेच अजूनही.
रोज संध्याकाळी शिकायला यायला टाळाटाळ का
चालते तेही कळलं. रात्रीचं जेवण हेच बहुतेकांचं पूर्ण दिवसाचं एकमेव जेवण असे.
कुठे पुरे पडणार अक्षरओळख भुकेच्या हाकेला?
त्यांच्या पोटात घास पडल्यानंतर शिकवायला
घ्यावं असं ठरलं. संध्याकाळी सहासात वाजता आमची शिकवणी सुरू व्हायची ती आता जेऊन
झाल्यावर घेऊ म्हटलं. पण जेवल्यावर नाचाले जायचं नायतर दमणूक झाली म्हणून झोपून
जायचं... तो अक्षरओळखीचा वर्ग काही धड पुरा झालाच नाही.
जे काही शिकायला मिळालं ते मलाच मिळालं.
मला अनोळखी प्रांताची ओळख झाली.
एक घटना अशीच कायमची हलवून गेली. दिवाळीचे
चार दिवस सारे वारली धमाल करतात. लाल भात,चवळी, भाजके बोंबील, पानातली भाकर, आणि
ताडी या जोरावर सारं गाव झिंगलेलं असतं.
सगळेच ताडी पिऊन ‘भरां माजूंन्ना’ झुलत असतात. आम्ही आणि आम्हाला वेळोवेळी सेंटरवर ठेवण्यासाठी औषधं वगैरे
विकत घेऊन देणारी काही मित्रमंडळी होती ती थोडे पैसे जमा करून बुंदीचे कडक लाडू
आणि फरसाण-चिवडा घरोघरी नेऊन द्यायचा बेत केला. दिवाळीच्या पहिल्या दिवशी
बोर्डीतून सामान घेऊन सेंटरवर जाऊन त्या पुड्या वगैरे रात्रीत बांधल्या. आणि
दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही निघालो. गावठाणातल्या बारापंधरा घरांतून वाटून
झाल्यावर आम्ही नदीपार गेलो. तिथे एक वारली बाप्यांचा एक गट चुपचाप बसून होता.
आम्हाला नदीतून येताना पाहाताच सगळे उठून उभे राहिले. जवळ आले.
त्यातला सोन्या आमचा सेंटरवर नेहमी येणारा
मित्र. त्याने बातमी फोडली. “भिवान् वनश्याचं डोचकं फोडलंय. तो
काय जगत नाय.”
आम्ही सुन्न. भिवा अगदी शांत माणूस.
ताडीपण न पिणारा. आणि वनशा- त्याचा धाकटा भाऊ सदा तराट. भिवा कष्टाळू तर वनशा
काहीच न करणारा. कसं शक्य आहे...
भराभर आम्ही त्यांच्या घरापाशी पोहोचलो.
हातातल्या पुड्या सोन्याला सर्वांना वाटायला सांगितल्या. भिवा दाराशीच उभा होता.
धनंजयने विचारलं, “का रे, भिवादा, काय केलं
तू?”
तो ओशाळा हसला, आणि म्हणाला, “क्या सांगू. सकाळीच यून्ना
शिव्या दिधेल आहें. म्हन म्हटला अक्कल घालावी. हातात बैलगाडीचा टेकाण आला त्येच
घातलां.”
आत वनश्याच्या घरात गेलो. वनश्या
रक्तबंबाळ होऊन पडलेला. डोकं चांगलंच फुटलेलं आणि चेहरा रक्ताने भरलेला. कुणालातरी
धावत जाऊन सेंटरवरून डेटॉल, सोफ्रामायसिन, कापूस, बॅंडेज आणायला पाठवलं. गरम पाणी
मागितलं. डोक्याखाली ठेवायला काही आहे का विचारलं. काही नव्हतंच घरात. त्याचंच एक
फाटकं जुनं टीशर्ट दिलं त्याच्या बायकोनं. ते पाण्यात बुडवून आम्ही चेहरा साफ
करायला सुरुवात केली. पुसून चेहरा स्वच्छ केला. रक्त वाहातच होतं. डेटॉल,
सोफ्रामायसिन आल्यावर स्वच्छ बॅडेज, कापसाने जखम मी कापऱ्या हातांनी साफ केली.
थोडी दाबून धरली. आणि सोफ्रामायसिनची ट्यूब त्यात जवळपास रिकामी केली.
पंधरावीस मिनिटं गेली असतील. मघा पाहिला
होता त्यापेक्षा त्याचा चेहरा बराच बरा वाटत होता. डहाणूला न्यायला रिक्शा आणायला
सायकल हाकत माणूस गेलेला. त्याला दवाखान्यात पोहोचवेपर्यंत तो जगला तर जगेल असं
आम्हाला वाटू लागलं. वाडघे वारली म्हणू लागले- ‘नाय बाय, नाय धनजी, तो जगाय नाय आथा...’
एक तास असाच सरला. आणि मग एक रिक्शा आणि
मोटरसायकलवरून पोलीस दोघेही आले. गावच्या पोलीसपाटलानेही सायकलवर जाऊन तक्रार
केलेली.
पोलीस भिवालाही अटक करून घेऊन गेले आणि
वनशाला दवाखान्यातही.
दिवाळीची वाट लागलेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही कोसबाडला एका
मित्राच्या घरी येऊ म्हणून सांगितलेलं. तिथून डहाणूला जाऊ आणि वनशाला बघून येऊ
म्हणून ठरवलेलं. दुपारी दोन वाजता कोसबाडहून डहाणूला गेलो. दवाखान्यात दारातच
आस्वलीचे दोघे चोघे होते. कळलं- वनश्या टाकाला. वनश्या मेला. धनंजयला आत जाऊन
प्रेत ओळखायला सांगितलं.
भिवा आत राहिला. केस सुरू झाली. दहा
महिन्यांत भिवा सुटला. वनश्याच्या बायकोला नि पोरांना भिवाच बघायचा. वनश्या
असतानासुध्दा. गावातल्या ज्येष्ठांनी तिला सांगितलं ‘तू त्याच्या विरुध जाऊ
नको. तो बाहेर आला तं तुला सांभाळील. पोरांनाहुं सांभाळील. वनश्या कसाक होता नायतरी...’
घडलं ते डोळ्यांनी पाहिलेली ती एकमेव
साक्षीदार होती. तिने अजिबात ब्र काढला नाही.
तक्रार केल्याबद्दल नंतर पोलीसपाटलाला खूप
शिव्या पडल्या होत्या.
भिवाने नंतर खरंच सर्व जबाबदारी पेलली.
शांत माणसाचा तोल ढळला तर काय होतं... नागर जनांत जे होतं तेच अनागर आदिवासींतही
होतं.
------
एकदा एक मुलगा शांतपणे सेंटरच्या ओवरीत
येऊन बसला. बाहेर येऊन बसला ते कळलंच नाही. मग कशालातरी बाहेर गेले तेव्हा दिसलं
ते पोर. अख्खं डोकं खरजेच्या फोडांनी, चिघळलेल्या जखमांनी भरलेलं. भीतीच वाटली
त्याचं ते डोकं पाहून. जाम किळसले. पण मग तोंड घट्ट मिटून सगळं साहित्य आणलं
बाहेर. डेटॉल. बेंझिन बेंझोएट. कापूस. मग लक्षात आलं. याचे केस कापल्याशिवाय औषध
नीट लागणार नाही. मग बारीक बॅन्डेज कापायची कात्री घेतली. जखमांना, टचटचलेल्या
फोडांना लागू न देता केस कापणं महामुश्कील होतं. त्याला विचारलं, “दुखेल हं. घेशील ना करून?”
त्याने मानेनेच होकार दिला. तो आलेला नागबंधपाड्यावरून चालत. मी
सावकाश सावकाश सगळे मधलेमधले केस कापून काढले. डेटॉल आधी लावलंच होतं. सारखी
कात्री डेटॉलने धुवून पुसून घ्यायला लागत होती. मधूनच रक्त पुसावं लागत होतं.
कात्री लागल्यामुळे नव्हे, केवळ नाजूक झालेली त्वचा धक्क्यानेच फाटून पू-रक्त येत
होतं. मधेच त्याचा चेहरा वर केला हनुवटीला धरून. ते पोर आवाज न करता टिपं गाळत
होतं. सारा चेहरा ओला झालेला. “फार दुखं क्या... आता जिराकुच
हां...”
तासभर की दोन तासभर कितीवेळ मी ते सारं
साफ केलं आणि मग बेंझिन बेन्झोएटने माखून टाकलं. ते पाहायला बरीच पोरं बाजूने गोळा
झालेली. पण कुणीही आवाज करीत नव्हतं. त्याला किती दुखत असेल, तो किती सोसतोय ते
त्यांनाही कळत होतं.
त्याला सगळ्या आवश्यक त्या सूचना दिल्या.
बेन्झिन बेन्झोएट तसंच अंगावर दोन दिस सुकू देस. धुवू नको. खाजवू नको. आणि परवा
परत ये.
तो परवाच्या दिवशी परत आला. पुन्हा सारं
डेटॉलने साफ केलं. कापसाने खरजेच्या खपल्याखवल्या काढून टाकल्या. नव्या पुळ्या
डोकं वर काढत होत्या त्या कापसाच्या चिमटीनेच खरडल्या. पुन्हा बेन्झिन बेन्झोएटचा
थर लावला.
मग दोन दिवसांनी पुन्हा. मग दोन दिवसांनी
पुन्हा.
दहा दिवस संपले. पंधरवड्याच्या शेवटी ते
पोर हसतच उड्या मारत आलं. आणि डोकं माझ्या समोर धरून बसून हसत राहिलं. मला खरंच
खूप बरं वाटलं.
आज खरजेचं बरंचसं निर्मूलन झालंय त्या
भागातून. असते, पण अशी जीवघेणी नसते. याबद्दल खरजेवर संशोधन करणाऱ्या आणि औषधं
शोधून काढणाऱ्या वैज्ञानिकांना मी अजूनही दुवा देते. आणि पाणी, साबण परवडू
लागण्यालाही.